News Flash

“फडणवीसांनी ‘हे’ मान्य केलं तेच खूप झालं!”, जितेंद्र आव्हाडांचं फडणवीसांना प्रत्युत्तर!

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

जितेंद्र आव्हाडांनी देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे.

रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंग आणि त्यामध्ये आलेल्या काही अधिकाऱ्यांच्या नावांसंदर्भात मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला आहे. मात्र, या अहवालावर विरोधकांनी टीका केली आहे. “हा अहवाल सीताराम कुंटेंनी तयार केलाच नसेल, तो जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला असावा”, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, अशी शंका घेणं हा सीताराम कुंटेंचा अपमान असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवर देखील काही ट्वीट्सच्या माध्यमातून आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

“पोलिसांनंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचं खच्चीकरण सुरू”

“पाच वर्ष ज्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं, ज्यांचं कुशाग्र बुद्धीसाठी कौतुक केलं जातं, अशा राजकीय धुरंधरानं राज्याच्या मुख्य सचिवांबद्दल अशी शंका व्यक्त करणं हा त्या मुख्य सचिवांचा, त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीची आणि त्यांच्या आवाक्याचा अपमान आहे. पोलिसांचं तर खच्चीकरण झालं आहे. आता प्रशासकीय अधिकाऱ्यांचं खच्चीकरण करणं सुरू आहे. आता सीताराम कुंटेंबद्दल आमच्या नावाने शंका उपस्थित करून त्यांना काय साध्य करायचंय? पण हे तर आहे की फडणवीसांनी किमान हे तरी मान्य केलं की आव्हाड अहवाल लिहू शकतात”, असं आव्हाड म्हणाले आहेत. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटरवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र फडणवीस यांचा हा आरोप हास्यास्पद आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही”, असं आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

“कुंटेंनी तर फक्त सही केली!”

“सीताराम कुंटेंनी दाखल केलेला रिपोर्ट ते तयार करतील असं मला वाटत नाही. हा रिपोर्ट आव्हाड किंवा मलिक यांनी तयार केला आणि कुंटेंनी त्यावर फक्त सही केली आहे”, असं फडणवीस म्हणाले होते.

आशिष शेलारांची शायरी!

दरम्यान, आशिष शेलार यांनी सीताराम कुंटे यांच्या अहवालावर शायरी करून टीका केली आहे. “एक लम्हे मे हुआ था फासलों का फैसला, फिर यकीन दिलाने मे जमाना लग गया”, असं शेलार म्हणाले आहेत. “आपली बाजू खरी आणि दुसऱ्याची बाजू काळी हे दाखवण्यासाठीचा हा अहवाल आहे. या अहवालाची निर्मिती प्रभादेवीच्या एका मुखपत्र कार्यालयातून झाला आहे. त्यामुळे याची सत्यासत्यता तपासता येणार नाही. त्यामुळे या प्रकरणात एक दिवस आधी मंत्रिमंडळ चौकशी ठरवतं आणि एका दिवसात चौकशीचा अहवाल येतो. ही तत्परता करोना रुग्णांना औषधं पुरण्यात सरकारने दाखवली नाही”, असं शेलार म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 5:26 pm

Web Title: jitendra awhad reacts on devendra fadnavi comment on sitaram kunte report pmw 88
Next Stories
1 सनराइज कोविड सेंटरला लागलेल्या आगीतील मृत्यू हे शिवसेनेच्या टक्केवारीचे बळी – भातखळकर
2 हिरेन प्रकरण : ATS ला छापेमारीपासून कोणी रोखलं हे जनतेला कळायला हवं; भाजपाचा ठाकरे सरकारवर निशाणा
3 आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर या सरकारला जाग येणार – फडणवीस
Just Now!
X