३१ जुलै रोजी भाजपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी प्रवेश केला. त्यानंतर ईडीच्या कारवाईची धमकी देऊन पक्षांतर केलं जातं आहे असा आरोप राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला. आता याच संदर्भात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही एक ट्विट करत भाजपाची खिल्ली उडवली आहे. पूर्वी काही येत नसेल तर चिडीचा डाव खेळायचे आता ईडीचा डाव खेळतात असे ट्विट करत आव्हाड यांनी भाजपाची खिल्ली उडवली आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ३१ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे, संदीप नाईक यांनी प्रवेश केला. गणेश नाईकही भाजपाच्या वाटेवर आहे. याबाबत बोलताना शरद पवार यांनी पक्षांतरासाठी भाजपाकडून आघाडीच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाईचा दबाव आणला जात असल्याचे म्हटले होते.

शरद पवार यांच्या याच वक्तव्यचा आधार घेऊन जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर निशाणा साधला. भाजपा चिडीचा डाव खेळत असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटमधून स्पष्ट केलं. त्यापुढेच वा रे अच्छे दिन असंही त्यांनी म्हटलं आहे.