आरे येथील वृक्षतोडीला शुक्रवारी रात्री सुरुवात करण्यात आली आहे. ज्यानंतर पर्यावरण प्रेमींनी या प्रकाराला विरोध दर्शवत आरे बचाव आंदोलन सुरु केलं आहे. या पार्श्वभूमीवर वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

या अगोदर दुपारी आव्हाड यांनी वृक्षतोडीवरून भाजपा-शिवसेनेवर निशाणा साधत, पडणारं प्रत्येक झाड हे त्यांचा एक आमदार पाडेल आणि याची जाणीव सरकारला झाली पाहिजे, असे म्हटले होते. शिवाय त्यांनी ट्विटरवर यासंदर्भात आपला एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

“आरेमध्ये कापण्यात येणारं प्रत्येक झाड आपला आमदार पाडेल याची जाणीव सरकारला व्हायला हवी. ती जाणीव झाल्यानंतर त्यांनी झाडं पाडण्याची हिंमत होणार नाही. काही महिन्यापूर्वी काही जण आरेला कारे करत होते. परंतु आता सर्वजण झोपा रे करत आहेत. परंतु आरेमध्ये झाडं तोडायला सुरूवात झाली. कोणी झाडांना मिठ्या मारणार होते. कोणी झाड तोडू देणार नव्हते, ते सर्व आहेत कुठे?” असा सवाल अव्हाड यांनी केला आहे.

‘आरे’च्या मुद्यावरून आता प्रशासन विरुद्ध पर्यावरणप्रेमी हा लढा उभा राहिला. या प्रकरणी जवळपास २९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. एका रात्रीत ४०० पेक्षा जास्त झाडं तोडण्यात आल्याने पर्यावरणप्रेमी आणि मुंबईकरांचा संताप उफाळून आला आहे.