मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच नागपूर येथील एका कार्यक्रमात इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी घोषणा केली. यासाठी विशेष धोरण आखण्यासोबतच अशा वाहनांच्या ‘रिचार्जिग’साठी पेट्रोलपंपसारखी केंद्रे उभी करण्याचे सूतोवाचही मुख्यमंत्र्यांनी केले. काळाची पावले ओळखत ऑटोमोबाइल उद्योगात यापूर्वीच इलेक्ट्रिक वाहने उभारण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यांना फारसे यश आले नाही. यातील त्रुटींवर मात करत नवतंत्रज्ञान विकसित करून इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करण्यासाठी एका तरुण उद्योजकाने इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या निर्मिती क्षेत्रात उडी घेतली आणि अल्पावधीत उद्योगाला यश मिळवले. ‘ओकनावा’ कंपनीच्या जितेंद्र शर्मा याच्या नवउद्योगाची ही यशोगाथा.

औरंगाबाद येथे शिक्षण झालेले मेकॅनिकल अभियंता जितेंद्र  शर्मा यांनी इतर तरुणांप्रमाणेच पदवी शिक्षणानंतर नोकरी स्वीकारली. त्यांना सुरुवातीपासून स्कूटरबद्दल प्रचंड आवड होती. यामुळे त्यांनी वाहन उत्पादन कंपनीत विपणनाचे काम स्वीकारले. विविध कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर तब्बल १५ वष्रे त्यांनी होंडा या कंपनीत विविध स्तरांवर नोकरी केली. यामध्ये त्यांनी अनेक परदेश दौरेही केले. या सर्वात त्यांना एक बाब लक्षात आली ती म्हणजे परदेशात पर्यावरणाची विशेष काळजी घेतली जाते. त्या तुलनेत भारतात पर्यावरण या विषयाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. यामुळेच पर्यावरणाच्या समस्या वाढण्यात कारणीभूत असलेल्या गाडय़ांची विक्री आजही मोठय़ा प्रमाणावर होत आहे. मूळचे दिल्लीचे असल्यामुळे शर्मा यांनी दिल्लीतील पर्यावरणाच्या समस्येची चांगलीच जाण होती. या प्रश्नावर काहीतरी करावे असे त्यांना नेहमी वाटत असे. पर्यावरण रक्षणासाठी सध्या एक ना अनेक उपाय केले जातात. पण ज्या वस्तूंमधून पर्यावरणाला हानी पोहोचली जाते त्या वस्तूंची विक्री मात्र दिवसेंदिवस वाढतच जात आहे. यामध्ये दुचाकी, चारचाकी, वातानुकूलित यंत्र यासारख्या रोजच्या वापरातील गोष्टींचा समावेश आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात या गोष्टींचा वापर करणे आवश्यक होऊ लागले आहे. यामुळे या गोष्टींच्या खरेदीवाचून पर्याय नाही. यामुळे या गोष्टींमध्येच बदल करून त्या पर्यावरणपूरक केल्या तर असा विचार अनेकांच्या मनात घोळू लागला. यातून पर्यावरणस्नेही उत्पादनांची निर्मिती होऊ लागली.

वाहन उत्पादन क्षेत्रही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असून अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक गाडय़ांची निर्मिती केली. मात्र त्यांना फारशी मागणी नसल्यामुळे कंपन्यांना त्याची निर्मिती थांबवावी लागली. पण शर्मा यांनी आपली पर्यावरणाच्या समस्येवर काम करण्याची इच्छा व स्कूटरची पॅशन या दोन्ही गोष्टींचा समावेश करून इलेक्ट्रिक स्कूटर तयार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी नोकरी सोडून २०१५ मध्ये ओकिनावा स्कूटर्स या कंपनीची स्थापना केली व विविध तज्ज्ञांचा चमू सोबत घेऊन त्यांनी कामास सुरुवात केली. यापूर्वी बाजारात अनेक इलेक्ट्रिक गाडय़ा आल्या होत्या. पण त्या गाडय़ा म्हणाव्या तितक्या यशस्वी झाल्या नव्हत्या. यामुळे सुरुवातीला त्यांनी त्यात नेमक्या अडचणी काय होत्या, हे शोधून काढण्यास सुरुवात केली. यामध्ये काही गोष्टी प्रामुख्याने जाणवल्या त्या म्हणजे या गाडय़ांचा पिक-अप कमी असतो. यामुळे अनेकदा इलेक्ट्रिकची गाडी सायकलच्या वेगानेच चालते. तसेच या गाडय़ांमध्ये चांगले शॉकअप्स वापरले जात नाही. ज्यामुळे भारतीय रस्त्यांवर या गाडय़ा चालवीत असताना अनेक धक्के बसत होते. या सर्व सुधारणा करून त्यांनी एका गाडीची निर्मिती केली. ती गाडी त्यांनी हरयाणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये सहा महिने तब्बल २५ हजार किलोमीटर इतकी चालवली. या प्रवासादरम्यान जाणवणाऱ्या त्रुटी तज्ज्ञ अभियंत्यांनी नोंदवून दिल्या. या त्रुटींवर काम करत त्यांनी जानेवारी २०१७ मध्ये ओकिनावा ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली. ही गाडी ताशी ७० कि.मी. इतक्या वेगाने प्रवास करू शकते. याचबरोबर यामध्ये वापरण्यात आलेल्या विशेष तंत्रज्ञानामुळे साधारणत: १५० सीसी गाडीप्रमाणे पिकअप घेण्याची क्षमता आहे. हा पिकअप या प्रणालीतील इतर गाडय़ांच्या पिकअपशी बरोबरी साधणारा आहे. यामुळेच त्यांच्या गाडीला विशेष मागणी आहे.

ही गाडी राजस्थान, उत्तर प्रदेश, हरयाणा या राज्यांमधील यशानंतर त्यांनी आता महाराष्ट्रातील बाजारपेठेवर लक्ष केंद्रित  केले आहे. या गाडीची निर्मिती करत असताना वापरलेल्या तंत्रज्ञानासाठी त्यांनी पेटंट अर्जही दाखल केला आहे. या गाडीला उत्तरेकडील राज्यात चांगले यश मिळाले आहे. मात्र ही गाडी विकण्यात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. यात प्रामुख्याने लोकांना गाडीचा वेग जास्त हवा असतो. आमच्या गाडीत तो ७० कि.मी.पर्यंत पोहोचला आहे. पण तोही अनेकांना कमी वाटतो. यामुळे गाडीचा वेग आणखी कसा वाढविता येईल याकडे आमचे लक्ष असेल असे शर्मा यांनी सांगितले. याचबरोबर गाडी खरेदी केली आणि लांबच्या प्रवासासाठी नेली तर चार्जिग स्टेशन्स उपलब्ध नाहीत. यामुळे सरकारने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

सामान्यत: ऑटोगिअर गाडय़ा एका लिटर पेट्रोलमध्ये ४० ते ४५ कि.मी. प्रवास करू शकतात. मात्र ही गाडी दोन युनिटमध्ये ८० ते ९० किमी इतका प्रवास करू शकते. एका लिटर पेट्रोलसाठी आज ७० ते ८० रुपये खर्च करावे लागतात तेच दोन युनिटसाठी ७ रुपये इतकाच खर्च येतो. याचबरोबर या गाडीच्या सेवेसाठी १५० रुपयांचा खर्च येतो तर इतर गाडय़ांना तो खर्च किमान ५०० रुपये इतका असतो. असे हिशोब मांडत शर्मा यांनी लोकांची मानसिकता बदलली व त्यांना या गाडीचे महत्त्व पटवून दिले. शर्मा यांनी इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करण्याचे अनोखे आव्हान स्वीकारून ते यशस्वी करून दाखविले आहे. याचबरोबर भविष्यात इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्यातही ते यशस्वी होणार आहे. पर्यावरण समस्या व भविष्यातील इंधन टंचाईच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सरकारने अशा वाहनांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचेही शर्मा यांनी नमूद केले. तसेच ज्या तरुणांना नवउद्योग करावयाचा आहे अशा तरुणांनीही काळाची पावले ओळखत भविष्यात कोणत्या व्यवसायाला गती मिळेल अशा व्यवसायाचीच निवड करावी. योग्य वेळी योग्य तो व्यवसाय करण्याचे कौशल्य त्यांनी अवगत करायला हवे. काळाच्या फार पुढे व फार मागे राहून काही उपयोग नसतो असा मौलिक सल्लाही शर्मा यांनी इच्छुक नवउद्यमींना दिला आहे.

@nirajcpandit