अडीच वर्षांत १०४ पारसी दाम्पत्यांना अपत्यप्राप्ती

देशभरात कमी होणाऱ्या पारसींच्या लोकसंख्येवर केंद्र व पारसी समाजाने मिळून सुरू केलेल्या ‘जियो पारसी’ या मोहिमेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातूनच गेल्या अडीच वर्षांत १०४ पारसी दाम्पत्यांना अपत्यप्राप्ती झाली आहे. येत्या काळात ही संख्या वाढविण्यासाठी जाहिरातींच्या माध्यमातून समाजात जनजागृती करण्याची योजना करण्यात आली आहे.

देशभरातील पारसी समाजाची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत असून १९४१च्या जनगणनेनुसार पारसींची लोकसंख्या १,१४,००० वरुन २०११ साली ५७,२६४ पर्यंत घटली आहे. दर वर्षांला पारसी समाजात २०० मुलांचा जन्म होत असला तरी मृत्यूचे प्रमाण ८०० पर्यंत आहे. पारसींची संख्या कमी होण्यामागे समाजांतर्गत विवाह पद्धत हे प्रमुख कारण आहे. त्याशिवाय घटस्फोट, विवाह न करणाऱ्या तरुणांची वाढती संख्या यामुळे पारसी समाज हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या समाजात वयाच्या चाळिशीनंतर विवाह करण्याची पद्धत असल्याने पुढे जाऊन मुलं होण्यास अडचणींना सामोरे जावे लागते, असे मत पारसी समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

मुंबईत ‘जियो पारसी’ या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याच्या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. नवीन पिढी वाढविण्यासाठी विविध जाहिरातींच्या माध्यमातून पिढी वाढविण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. पारसी समाजात दरवर्षांला २०० मुले जन्माला येतात, मात्र २०१४ मध्ये ‘जियो पारसी’ ही मोहीम सुरू केल्यानंतर गेल्या दोन वर्षांत जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या वाढली आहे. जियो पारसी या मोहिमेमुळे गेल्या अडीच वर्षांत १०४ दाम्पत्यांना मुले झाली आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत ही संख्या ५०० पर्यंत पोहोचली आहे, असे ‘जियो पारसी’ मोहिमेच्या प्रमुख शेरनाझ कामा यांनी सांगितले.

गेल्या आठवडय़ात मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदी चित्रपटक्षेत्रातील अनेक पारसी अभिनेते उपस्थित होते. दुसऱ्या टप्प्यात विविध जाहिरातींच्या माध्यमातून पारसी समाजामध्ये जनजागृती वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. पारसी नागरिकांनी आपला समाज वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात करण्यात आले. या वेळी पारसी नागरिकांनी भूमिका केलेल्या दृक्श्राव्य जाहिराती  दाखविण्यात आल्या. या मोहिमेत परझोर फाऊंडेशन, बॉम्बे पारसी पंचायत यांचाही समावेश आहे. त्याशिवाय बोमन इराणी हा अभिनेता ‘जियो पारसी’ या मोहिमेचा प्रचारप्रमुख आहे.