चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका

आपल्या विविध मागण्यांकरिता राज्य सरकारच्या अखत्यारीतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका मंगळवारी मुंबईतील जे. जे., सेंट जॉर्ज अशा सरकारी रुग्णालयांमध्ये उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांना बसला.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अखत्यारीतील रुग्णालयांमध्ये चतुर्थ श्रेणी सेवांचे खासगीकरण करण्याबाबत स्वीकारलेल्या धोरणाच्या निषेधार्थ मुंबईतील पाच रुग्णालयांसह महाराष्ट्रातील २७ विविध सरकारी रुग्णालयांत हा संप करण्यात आला. सुरुवातीला तीन दिवसांचा म्हणून जाहीर झालेला संप पहिल्या दिवशीच गुंडाळण्यात आला. मात्र जेजे, सेंट जॉर्ज अशा महत्त्वाच्या रुग्णालयांतील कर्मचारी संपावर गेल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागला.

जेजेमध्ये बाह्य़ रुग्ण विभागात सुमारे पाच हजारांहून अधिक रुग्ण दररोज येत असतात. रुग्णांना मार्गदर्शन करणे, उपचारासाठी योग्य विभागात घेऊ न जाणे, डॉक्टरांना सर्व सोयी उपलब्ध करून देणे, स्वच्छतेची व्यवस्था पाहणे, अपंग-गरजू व्यक्तींची ने-आण करणे, एक्स-रे, सिटी स्कॅन, एम.आर.आय. अशा वैद्यकीय चाचण्यांकरिता रुग्णांना साहाय्य करणे अशी विविध कामे चतुर्थ श्रेणी कर्मचारी करत असतात; परंतु संपामुळे रुग्णालयात

काहीसे गोंधळाचे वातावरण होते. काही ठिकाणी पोलीसच रुग्णांचे स्ट्रेचर, व्हीलचेअर ढकलून नेण्यास मदत करत होते. शिकाऊ डॉक्टरही या कर्मचाऱ्यांची कामे करत होते. रुग्णांसोबत डॉक्टरांचीही गैरसोय होत होती. बाह्य़ रुग्ण विभागापेक्षा शस्त्रक्रिया विभागावर संपाचा परिणाम दिसून आला. शस्त्रक्रि येच्या पूर्वतयारीपासून ते अधूनमधून लागणारे साहाय्य, स्वच्छता, आवराआवर ही कामे चतुर्थ श्रेणी कर्मचारीच करतात. त्यांच्या संपामुळे अनेक शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या. संपाचा रुग्णालयाच्या कामकाजावर परिणाम झाला नसल्याची प्रतिक्रिया जेजेच्या वरिष्ठ डॉक्टरांनी दिली. आमच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने आम्ही पर्यायी व्यवस्था के ली होती. संपाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ असल्याने आम्ही त्यानुसार कामाचे नियोजन केले होते, असे त्यांनी सांगितले.

शासकीय दंत रुग्णालय आणि महाविद्यालयातील सुमारे ९० टक्के कर्मचारी मंगळवारी झालेल्या आंदोलनात सहभागी होते. परिणामी रुग्णांना उपचार देण्यात अडचण जाणवत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. तसेच काही रुग्णांना प्राथमिक उपचारानंतर परत पाठविण्यात आले, अशी माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गोपनीयतेच्या अटीवर दिली. याच परिसरात असलेल्या सेंट जॉर्ज रुग्णालयातील कर्मचारी संपात सहभागी न झाल्याने येथील सेवा सुरळीत सुरू होती.

अन्यथा आंदोलन तीव्र

चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष भाऊ साहेब पठाण यांनी पदाधिकाऱ्यांसह वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकांची भेट घेतली. जुलैअखेपर्यंत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन देऊ न आंदोलन मागे घेण्याची विनंती के ल्यामुळे तूर्तास संपाला स्थगिती देण्यात आल्याचे या भेटीनंतर त्यांनी सांगितले. संप मागे घेतला असला तरीही वेळेत कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असे त्यांनी सांगितले.