रविवारी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात आला. जेएनयूमधील हल्ल्याचे वृत्त समजताच मोठ्या संख्येने विद्यार्थी गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात जमले आणि रात्रभर या ठिकाणी धरणे दिले. ‘ऑक्युपाय गेटवे’ या मोहिमेतून विद्यार्थ्यांचे लोंढे ‘गेटवे’कडे वळू लागले. मंगळवारी पोलिसांनी आंदोलकांना गेट वे ऑफ इंडिया या परिसरातून हटवलं. तसंच त्यांची रवानगी आझाद मैदानात करण्यात आली. परंतु काही वेळानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

“आम्हाला पोलिसांनी जबरदस्ती आझाद मैदानात नेलं होतं. परंतु आम्ही ‘ऑक्युपाय गेटवे’ हे आंदोलन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन यशस्वी झालं आहे. असं असलं तरी आमचा विरोध कायम राहिल. आमच्याकडे अनेक नियोजित कार्यक्रम आहेत,” अशी प्रतिक्रिया आंदोलक कपिल अग्रवाल यानं दिली.

आंदोलकांची आझाद मैदानात रवानगी
पोलिसांनी कोणत्याही आंदोलकाला ताब्यात घेतलं नसून त्यांना केवळ आझाद मैदानात हलवण्यात आल्याची प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त (झोन-१) संग्रामसिंह निशाणदार यांनी दिली होती. दोन दिवसांपूर्वी जेएनयूमध्ये जी घटना घडली त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे. सामान्य मुंबईकरांना त्रास होऊ देऊ नका, असं आम्ही या आंदोलनाच्या आयोजकांना सांगितलं होतं. तसंच त्यांनीही याबाबत आश्वासन दिलं होतं. या आंदोलनात अनेक जण जोडले गेले. त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया परिसरात येणाऱ्या लोकांना त्रास झाला, असंही त्यांनी नमूद केलं होतं.

गेटवे ऑफ इंडियानजीक असलेलं ताज महाल हॉटेल ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. त्या ठिकाणी देशातून तसंच परदेशातूनही अनेक पर्यटक येत असतात, कामासाठी मुंबईकर येत असतात. त्यामुळे आम्ही आंदोलकांना अन्य ठिकाणी आंदोलन करण्याची विनंती केली होती. परंतु आंदोलक त्या ठिकाणीच आंदोलन करत होते. कोणत्याही आंदोलकाला ताब्यात घेतलं नाही, असंहगी निशाणदार यांनी नमूद केलं.