मुंबईत गेल्या बुधवारी मुसळधार पाऊस कोसळत असताना मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज असलेल्या दोन सफाई कामगारांचा मृत्यू झाला. पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी या दोन्ही कामगारांच्या प्रत्येकी एका वारसाला पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे, तसेच त्यांची नियमानुसार देणी तात्काळ देण्याचे आदेश दिले. आयुक्तांच्या आदेशानुसार मृत कामगारांच्या वारसांना नोकरीचे नियुक्तिपत्र आणि विमा योजनेअंतर्गत एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

गेल्या बुधवारी ‘पी-दक्षिण’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत मालाड परिसरात मुसळधार पाऊस होत असताना कर्तव्यावर असलेले सफाई कामगार जगदीश परमार (५४) यांचे हृदयविकाराने निधन झाले. तसेच सफाई कामगार विजेंद्र बागडी (४०) कर्तव्यावर असताना वाहत्या पाण्यात पडले. अन्य कामगारांनी त्यांना वाहत्या पाण्यातून बाहेर काढले आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ट्रॉमा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.

आयुक्तांच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अशोक खैरे, ‘पी-दक्षिण’ विभाग कार्यालयाच्या साहाय्यक आयुक्त चंदा जाधव, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अभियंता अशोक यमगर यांनी शनिवारी जगदीश परमार आणि विजेंद्र बागडी यांच्या कुटुंबातील एका वारसाला नोकरीचे नियुक्तिपत्र आणि सफाई कामगार विमा योजनेअंतर्गत एक लाखाचा धनादेश सुपूर्द केला.