माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राज्याची भरारी; सुभाष देसाई यांचा दावा

महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांत उद्योग क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. एकटय़ा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात २०१४-१८ या चार वर्षांच्या कार्यकाळात ११९ नवे माहिती तंत्रज्ञान पार्क सुरू झाले असून त्यात १९ हजार ६० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि पाच लाख ५० हजार ४०० रोजगारनिर्मिती झाल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

उद्योग विभागाने सन २०१४ ते १८ पर्यंत विविध योजना व धोरणे आखून गुंतवणूक व रोजगारनिर्मितीला चालना दिली. मॅग्नेटिक महाराष्ट्र उपक्रमात ३८४२ सामंजस्य करार झाले आहेत. त्यांपैकी २८६ प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झाले असून त्याद्वारे एक हजार ८६४ कोटींची गुंतवणूक आली असून  ७५०० जणांना नोकरी मिळाली आहे. २७६ प्रकल्पाचे बांधकामे सुरू आहेत. त्याद्वारे अकरा हजार सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यातून पंधरा हजार जणांना रोजगार मिळणार आहे.

तसेच २६६६ प्रकल्पासाठी उद्योजकांनी एमआयडीसीकडे पैसे जमा करून जमिनी घेतल्या आहेत. त्यातून ४६ हजार ६६२ कोटींची गुंतवणूक होणार असून एक लाख २६ हजार ६८१ जणांना रोजगार मिळणार आहे. सीएट टायर, रेमंड, इंडो श्याम, जी-इलेक्ट्रिक, फिलीप, पर्किंग्ज, सातारा फूड पार्क, पैठण फूड पार्क, हायर इलेक्ट्रॉनिक आदी कंपन्या राज्यात दाखल झाल्या आहेत. सामंजस्य करार झालेल्या एकूण प्रकल्पांपैकी ८४ टक्के काम वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहे, अशी आकडेवारी सुभाष देसाई यांनी विधानसभेत या विषयावर बोलताना मांडली. भाजप-शिवसेना सरकारने राज्याच्या सर्व भागांत उद्योग यावेत यासाठी प्रयत्न केले असून त्यामुळे नव्या प्रकल्पांमध्ये विदर्भात ५०५, मराठवाडय़ात ४७२, नाशिकमध्ये २२६, पुणे विभागात ७८३, कोकणात ५४० प्रकल्पांसाठी सामजंस्य करार झाले आहेत. त्यातून ३ लाख ८९ हजार कोटींची गुंतवणूक होणार असून सुमारे १ लाख ३६ हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. मेक इन इंडिया उपक्रमाद्वारे देशात २१ लाख ६१ हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. त्यापैकी सहा लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक एकटय़ा महाराष्ट्रात झाली आहे. त्याअंतर्गत राज्यात अनेक कंपन्या सुरू झाल्या आहेत. यामध्ये रिलायन्स इन्फ्रा, बॉम्बे रेयॉन, इंडस, अस्मिता टेक्सटाइल पार्क, राष्ट्रीय केमिकल फर्टिलाझर आदी कंपन्यांनी आपले प्रकल्प सुरू केले आहेत, असेही देसाई यांनी सांगितले.