बेस्टमध्ये करोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढतच आहे. आतापर्यंत सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून त्यांचा वारसांना नोकरी देण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला होता. यातील चार मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना बेस्टमध्ये नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहे. तर उर्वरित मृत कर्मचाऱ्यांच्या  वारसाला, नातेवाईकाला लवकरच उपक्रमाच्या सेवेत दाखल करुन घेण्यात येईल अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली. बेस्टमधील करोनाग्रस्त कर्मचाऱ्याची संख्या १०८च्या वर पोहोचली आहे.  करोनाविरुद्धच्या संकटात काम करत असताना मृत झालेल्या कर्मचाऱ्याची पत्नी, मुलगा,भाऊ, अविवाहित मुलगी किंवा बहिण यांना नोकरीत सामावुन घेण्यात येणार आहे. ही नोकरी तृतीय आणि चतुर्थ श्रेणी वर्गांतील आहे. त्यानुसार बेस्ट प्रशासनाने वारसांना नियुक्तीचे आदेश देत कायमस्वरूपी आर्थिक आधार देऊ केल्याची माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिली.