तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एस.व्ही. रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणारा जोगेश्वरीच्या उत्तरेकडील उड्डाणपूल एप्रिल महिन्याच्या अखेरीस नागरिकांसाठी खुला होणार आहे.
२५० कोटींपेक्षा जास्त किमतीचा हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आला होता. आठ वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या तक्रारींमुळे हा प्रकल्प एवढी वर्षे प्रलंबित होता. उच्च न्यायालयाने २० दिवसांपूर्वी हे प्रकरण निकालात काढल्यानंतर मागील महिन्यात तोडण्यात आलेले बांधकाम २१ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्व आणि पश्चिम भागाला जोडण्यास मदत होईल. लोखंडवाला आणि ओशिवरा भागातून येणाऱ्या वाहनांना पश्चिम द्रुतगती महामार्गावरून बाहेर पडता येईल. तसेच एस.व्ही. रोडवरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी सांगितले.
लिंक रोडवर नवा प्रकल्प
जोगेश्वरीच्या राम मंदिरापासून सुरू होणारा हा २ कि.मी.चा पूल एस.व्ही. रोडपर्यंत येऊन संपणार आहे. अशा प्रकारचाच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर एक नवा प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. काही काळानंतरच दुसरा प्रकल्प हाती घेण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. आम्ही दुसऱ्या प्रकल्पासाठी काही प्रावधाने तयार केली आहेत. या प्रकल्पाच्या बांधणीची सुरुवात कंत्राटदाराच्या नियुक्तीनंतरच करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.