प्रवाशांच्या मागणीनुसार ‘त्या’सहा लोकल गाडय़ांना जोगेश्वरी स्थानकात पुन्हा थांबे

पश्चिम रेल्वेकडून १ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आलेल्या नवीन वेळापत्रकात जोगेश्वरी स्थानकात चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या सहा लोकल गाडय़ांचे थांबे रद्द करण्यात आले होते. मात्र प्रवाशांची मागणी लक्षात घेता शनिवारपासून पुन्हा या गाडय़ांना जोगेश्वरीत थांबे देण्यात येणार आहेत. परंतु हे थांबे देताना लोकल गाडय़ांचा वक्तशीरपणा सुरळीत ठेवण्यासाठी त्या सहापैकी चार लोकल गाडय़ांचे अंधेरी स्थानकातील थांबे रद्द केले आहेत. त्यामुळे पुन्हा नव्याने वाद होण्याची शक्यता आहे.

पश्चिम रेल्वेवर नवीन लोकल गाडय़ांचे वेळापत्रक लागू करतानाच गर्दीच्या वेळी जादा गाडय़ा, तसेच काही गाडय़ांचा वेग वाढविण्यात आला होता. याचबरोबर पूर्वी जोगेश्वरी स्थानकात चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या सहा लोकल गाडय़ांचे असलेले थांबे मात्र नव्या वेळापत्रत रद्द करण्यात आले होते. मालाड, गोरेगाव स्थानकातून सुटणाऱ्या या गाडय़ांचे थांबे रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय होण्यास सुरुवात झाली. त्याविरोधात १ नोव्हेंबर रोजीच प्रवाशांनी स्टेशन मास्तरकडे निषेध व्यक्त करून लेखी तक्रारही दिली. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनीही शुक्रवारी रेल्वे मंत्रालय व पश्चिम रेल्वेकडे पाठपुरावा करून प्रवाशांसाठी या लोकल गाडय़ांना थांबे देण्याची विनंती केली.

अखेर ही मागणी लक्षात घेता रद्द केलेल्या सहा लोकल गाडय़ांना पुन्हा थांबे देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला. परंतु हे थांबे देताना सहापैकी चार लोकल गाडय़ांचे अंधेरी स्थानकातील थांबे रद्द केले आहेत. त्यामुळे अंधेरी स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले की, प्रवाशांची मागणी लक्षात घेत ‘त्या’ सहा लोकल गाडय़ांना ३ नोव्हेंबरपासून जोगेश्वरी स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.. परंतु हे थांबे दिल्याने लोकल गाडय़ांच्या वक्तशीरपणा सुरळीत ठेवण्यासाठी अंधेरी स्थानकात सहापैकी चार लोकल गाडय़ांना थांबा नसेल.

नवीन वेळापत्रक लागू होण्यापूर्वी या सहा लोकल गाडय़ांना जोगेश्वरी स्थानकात थांबा होता. अंधेरी स्थानकात मात्र थांबे नव्हते. परंतु नवीन वेळापत्रक लागू होताच जोगेश्वरीचे थांबे रद्द केले व अंधेरीला थांबे दिले. मात्र पुन्हा त्यात बदल करत जोगेश्वरी स्थानकात थांबे देऊन अंधेरी स्थानकासाठी मात्र बदल केले.