एमएमआरडीएने बांधलेल्या बहुतांश स्कायवॉक वापराविना जागा अडवून धरत असतानाच महानगरपालिकेने जोगेश्वरी येथे पूर्व-पश्चिम विभाग जोडणारा स्कायवॉक बांधण्याचे ठरविले आहे. दहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या या स्कायवॉकसाठी सरकते जिने लावले जाणार असल्याने तो पादचाऱ्यांसाठी दिलासा ठरू शकेल.
वांद्रे येथील स्कायवॉकचा अपवाद वगळता शहरात इतरत्र बांधलेल्या स्कायवॉकना फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याने एमएमआरडीएने नवीन स्कायवॉक बांधण्याचा प्रकल्प तीन वर्षांपूर्वी गुंडाळला. मात्र आता महानगरपालिका प्रशासनाने जोगेश्वरी पूर्व व पश्चिम भाग जोडण्यासाठी स्कायवॉक बांधण्याचे ठरवले आहे. यापूर्वी उंच स्कायवॉकवर चढण्यासाठी त्रास होत असल्याने बहुतांश पादचारी खालच्या, रहदारीच्या मार्गावरूनच चालणे पसंत करतात. ही स्थिती लक्षात घेऊन पालिकेने स्कायवॉकला सरकते जिने लावण्याचा निर्णय घेतला आहे.
जोगेश्वरी पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील माल्कम बागेपासून पूर्वेकडील इस्माइल युसुफ महाविद्यालयापर्यंत हा स्कायवॉक होणार असून त्याला सरकते जिने बसविले जातील. या स्कायवॉकच्या आरेखनासाठी मे. एस. एन. भोबे आणि असोसिएट्स यांची सल्लागारपदी नेमणूक केली होती. हा स्कायवॉक बांधण्यासाठी सर्वात कमी किंमतीची निविदा मे. एस. व्ही. इनोव्हाबिल्ड प्रा. लि. कडून आली आहे. काम दिल्यापासून अठरा महिन्यात स्कायवॉक बांधणे अपेक्षित आहे. स्थायी समितीच्या गुरुवारी होत असलेल्या सभेत मंजुरी मिळाल्यास दोन वर्षांत हा स्कायवॉक तयार होईल.