19 September 2020

News Flash

सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी

परिक्षेविरोधातील सर्व याचिका

संग्रहित छायाचित्र

सप्टेंबरअखेपर्यंत अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाला देशभरातील विविध राज्यांतील विद्यार्थी आणि संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून या याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याचे आदेश न्यायालयाने गुरुवारी दिले.

युवासेनेने दाखल केलेल्या याचिकेचीही सुनावणी या एकत्रित याचिकांबरोबर होणार आहे.

आयोगाने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय कायम ठेवत परीक्षांसाठी सुधारित वेळापत्रक ६ जुलै रोजी जाहीर केले. या निर्णयाला महाराष्ट्रासह काही राज्यांत विरोध होत आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अंतिम परीक्षा रद्द कराव्यात यासाठी १३ राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील ३१ विद्यार्थ्यांनी (प्रणीथ के विरुद्ध केंद्र सरकार) सर्वोच्च न्यायालयात यचिका दाखल केली असून त्यावर न्या. एल. नागेश्वर राव व न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली.

याचिकाकर्त्यां विद्यार्थ्यांपैकी एकाला करोनाचा संसर्ग झाला असून अंतिम परीक्षा घेण्यासाठी ही योग्य वेळ नसल्याचे याचिकांकर्त्यांचे म्हणणे आहे.

युवासेनेनेही आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याशिवाय मध्य प्रदेशमधील विधि शाखेच्या अंतिम वर्षांतील विद्यार्थी यश दुबे यांचीही याचिका आहे. युवासेनेच्या याचिकेसह सर्व याचिका एकत्र करून त्यांची सुनावणी न्यायमूर्ती भूषण यांच्या खंडपीठासमोर होणार आहे. सोमवारी ही सुनावणी सुरू होणे अपेक्षित आहे.

केंद्रीय अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांनी ३० सप्टेंबपर्यंत अंतिम परीक्षा पूर्ण कराव्यात असा आदेश ६ जुलै रोजी काढला होता. अंतिम परीक्षा घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे वा वर्षभरात झालेल्या परीक्षांच्या आधारे अंतिम निकाल द्यावा व ३१ जुलैपर्यंत गुणपत्रिका तयार करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यां विद्यार्थ्यांनी केली आहे.

उच्च न्यायालयात आज सुनावणी

राज्याने अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची सुनावणी शुक्रवारी होणे अपेक्षित आहे. मात्र दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयामध्येही याचिका दाखल झालेल्या असल्यामुळे आणि राज्यातील युवासेनेनेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे उच्च न्यायालय काय भूमिका घेणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

‘एनएसयुआय’ची याचिका फेटाळली

विद्यापीठ व महाविद्यालयीन परीक्षांच्या संदर्भात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (एनएसयूआय) दाखल केलेली याचिका न्या. भूषण, न्या. आर. सुभाष रेड्डी आणि न्या. एम. आर. शहा यांनी फेटाळली असल्याची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली. त्यावर न्या. राव यांनी अन्य याचिकांवरील सुनावणीही न्या. भूषण यांच्या न्यायालयापुढे होईल, असे सांगितले.

परीक्षांसाठी ६०३ विद्यापीठे अनुकूल

देशातील केंद्रीय,  राज्य,  खासगी, अभिमत अशा एकूण ८१८ विद्यापीठांना केंद्रीय अनुदान आयोगाने परीक्षा घेण्यासंदर्भात भूमिका विचारली होती. त्यापैकी २०९ विद्यापीठांनी परीक्षा घेतल्या आहेत, ३९४ विद्यापीठांनी परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 12:19 am

Web Title: joint hearing in the supreme court all petitions against the examination abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 झारखंडमध्ये मुखपट्टी न वापरल्यास एक लाखापर्यंत दंड
2 पँगाँग त्सोमधील कोंडी फोडण्यासाठी पुन्हा चर्चा?
3 लोकसभा, विधानसभेच्या पोटनिवडणुका लांबणीवर
Just Now!
X