मनसेच्या तेराव्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांनी आक्रमक भाषण करत मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी निवडणुकांच्या आधी किंवा निवडणुकांचे टप्पे सुरु असताना पुन्हा एकदा पुलवामा सारखा हल्ला घडवला जाईल असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. मात्र हे वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण राज ठाकरे यांच्या याच वक्तव्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार एस बालकृष्णन यांनी तक्रार केली आहे.

एस बालकृष्णन यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात राज ठाकरेंच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. राज ठाकरे हे एका पक्षाचे जबाबदार नेते आहेत. त्यांची वक्तव्ये ही गांभीर्यानं घेतली जातात. असं असूनही त्यांनी मोदींविरोधात भाष्य करताना पुलवामासारखा एखादा हल्ला पुन्हा घडवला जाईल असं त्यांच्या भाषणात म्हटलं. हे त्यांचं वक्तव्य बेजबाबदार असून याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा असं बालकृष्णन यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे. आता या तक्रारीनंतर काय होणार हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही.

मनसेच्या वर्धापन दिनी काय म्हटले होते राज ठाकरे?

निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामासारखा हल्ला पुन्हा एकदा घडवला जाईल असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. २५ डिसेंबर २०१५ ला मोदींनी नवाज शरीफ यांनी पाकिस्तानात जाऊन केक भरवला, पुढे सहा ते सात दिवसात पठाणकोट येथील हवाई तळांवर हल्ला झाला. इतर निवडणुकांच्या आधीही असेच प्रकार घडले. निवडणुका जिंकण्यासाठी हे सगळे प्रकार केले जातात. निवडणुकांच्या तोंडावर भाजपाचे लोक काय करू शकतील याचा अंदाज मी बांधू शकतो मी ज्योतिषी म्हणून हे अंदाज वर्तवत नाही असेही राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.

मागील पाच वर्षात या सरकारला दिलेलं एकही आश्वासन पाळता आलेलं नाही. रोजगाराच्या संधी असोत, शेतकऱ्यांना मदत देणं असो, गरीबांना शिक्षण असो सगळ्या आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरलं आहे त्याचमुळे जवानांची मदत घेऊन सरकार निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.