चलनकल्लोळामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांचा काळाबाजार करणाऱ्या एका इसमाचे ‘स्टींग ऑपरेशन’ करणाऱ्या माध्यमांच्या चार प्रतिनिधींवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सोमवारी हा प्रकार विक्रोळी पूर्व येथील हरयाली भागात घडला. या प्रकरणी दंगल, मारहाण करणे आणि जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्य़ाखाली दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

विक्रोळी कन्नमवार नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रोळी येथील हरयाली भागात श्याम डेअरीचा मालक राजेश यादव (३७) हा पाचशे रुपयाच्या बदल्यात चारशे आणि हजार रुपयाला आठशे रुपये देत असल्याची माहिती खाजगी वाहिनीच्या प्रतिनिधींना मिळाली. अमोल पेडणेकर (झी २४ तास), प्रशांत बढे (महाराष्ट्र-१), संतोष पांडे (दोपहर का सामना) आणि होमन्यूजचे कॅमेरामन मयुरेश राणे या माध्यम प्रतिनिधींनी यादव करत असलेल्या खोटय़ा व्यवहाराचे स्टींग ऑपरेशन केले. यावेळी या चौघांपकी बढे आणि पेडणेकर यांना लाथाबुक्यांनी मारून अंगावर सायकल टाकून जखमी करण्यात आले. तर पांडे या जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी गुल्लन यादव (४०) याला अटक करण्यात आली असून या घटनेतील ५ आरोपी अद्याप फरार असल्याचे कन्नमवार नगर पोलिसांनी स्पष्ट केले.