उबर टॅक्सीत महिला प्रवाशाकडूनच एका महिला पत्रकाराला मारहाण झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. उष्णोता पॉल असे या महिला पत्रकाराचे नाव आहे. घडला प्रकार सांगण्यासाठी तिने ट्विटरचा आधार घेतला आहे. मुंबईतील लोअर परळ भागात ही घटना घडली आहे. ज्या महिला प्रवाशाने मला मारहाण केली तिला पकडले जावे अशी विनंती तिने केली आहे. इतकेच नाही तर तिने या महिला प्रवाशाविरोधात FIR ही नोंदवली आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये उबर आणि मुंबई पोलिसांनाही टॅग केले आहे.

उबरमध्ये तिच्यासोबत बसलेली महिला प्रवासी शेवटी उतरावे लागणार म्हणून कटकट करत होती. मलाच जास्त पैसे द्यावे लागणार आहेत तरीही शेवटी उतरायचे हे बरोबर नाही असे या महिलेचे म्हणणे होते. त्यानंतर मी तिला रस्ता कसा जवळचा आहे हे समजावून सांगू लागले तर तिने मलाच शिव्या देण्यास सुरुवात केली असे ट्विट उष्णोता पॉलने केले आहे. ज्या शिव्या त्या महिलेने मला दिल्या त्या मी लिहूही शकत नाही असेही उष्णोताने म्हटले आहे.

त्यानंतर या बाईकडे दुर्लक्ष करायचे म्हणून मी माझा फोन पाहू लागले. तरीही त्या बाईने शिव्या देणे सुरुच ठेवले. वाद होऊ नये म्हणून मी मधे बॅगही ठेवली पण ती बाई शांतच बसेना. लोअर परळ आल्यावर त्या बाईने अचानक माझ्यावर हल्लाच चढवला. मला नखे मारली, माझे केस ओढले, चेहऱ्यावरही नखे मारली आणि मला मारहाण केली असा आरोप उष्णोता पॉलने तिच्या ट्विटमध्ये आणि पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.

ही महिला नेमकी कोण होती याची माहिती देण्यास उबर इंडियाने नकार दिला आहे त्यामुळे उष्णोता पॉलने पोलिसात धाव घेऊन तिच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आता पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.