मुंबई : बेकायदा बांधकाम, तसेच निवासी इमारतीचे हॉटेलमध्ये रूपांतर केल्याच्या आरोपाप्रकरणी पालिकेने केलेल्या कारवाईविरोधात अभिनेता सोनू सूदने केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय गुरुवारी निकाल देणार आहे.

सुनावणीच्या वेळी पालिका आणि सोनूने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सोनूने केलेल्या याचिकेवरील निर्णय न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी राखून ठेवला होता.

आपण कोणतेही बांधकाम केलेले नाही. त्यामुळे पालिकेची कारवाई चुकीची, सूडबुद्धीने केलेली असून ती रद्द ठरवण्यात यावी, अशी मागणी सोनूने केली होती. तर वारंवार नोटीस बजावून आणि कारवाई करूनही सोनूने बेकायदा बांधकाम सुरूच ठेवल्याचा आरोप पालिकेने केला होता. त्यामुळे सोनूवर करण्यात आलेली कारवाई योग्य असून त्याला कोणत्याही प्रकारचा दिलासा दिला जाऊ नये, अशी मागणी पालिकेच्या वतीने करण्यात आली होती.