नक्षलवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय विभागाचा अध्यक्ष, तसेच या चळवळीसाठी देशपातळीवर समन्वयाचे काम करणाऱ्या दिल्ली विद्यापीठातील प्रा.जी.एल.साईबाबा याला आज अहेरीच्या प्रथमश्रेणी न्यायालयात हजर केल्यावर न्यायाधीश एन.जी.व्यास यांनी त्याला २३ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, साईबाबाच्या अटकेने नक्षल चळवळीला देश-विदेशातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या बुध्दीवंतांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.
शारीरिकदृष्टय़ा अपंग असलेल्या साईबाबाला आज व्हिलचेअरवर अहेरीच्या प्रथमश्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीश एन.जी. व्यास यांनी गडचिरोली पोलिस व साईबाबाचे वकील अ‍ॅड. जगदीश मेश्राम अशा दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून त्याला २३ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी साईबाबा याला युएपी कायद्याच्या कलम १३, १८, २०, ३८,३९ अन्वये अटक केली आहे. आपण अपंग असल्याने पाश्चिमात्य बाथरूम, दोन मदतनीसांची मागणी साईबाबाने न्यायाधीशांकडे केली.