मुंबई-गोवा महामार्गावर महाड एमआयडीसीजवळील पूल कोसळल्याच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तिथे रेकॉर्डब्रेक वेळेत नवा पूल बांधण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.
वाचा : ‘लोकसंख्या जास्त झाल्याने आपल्याकडे माणसांच्या मरणाची किंमतच राहिलेली नाही’
महाडजवळील पूल पडण्याच्या घटनेचे पडसाद सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेत उमटले. या विषयावर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना स्वतः फडणवीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ज्या ठिकाणी हा पूल पडला, तिथे शेजारी वेगळा पूल आहे. त्यामुळे तूर्त तेथून वाहतूक सुरू राहिल. पण घटनास्थळी रेकॉर्डब्रेक वेळेत राज्य सरकार नवा पूल बांधेल. त्यासाठी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येईल. राज्यातील ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिटसाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गावर जुना पूल मंगळवारी रात्री कोसळला. या दुर्घटनेमुळे दोन एसटी बससह पाच ते सात वाहने सावित्री नदीत बुडाली. नदी बुडालेल्या वाहनांचा आणि प्रवाशांचा बुधवारी सकाळपासून शोध घेण्यात येतो आहे. त्यासाठी एनडीआरएफची चार पथके, त्याचबरोबर तटरक्षक दलाचे जवान घटनास्थळी कार्यरत आहेत. स्वतः फडणवीस यांनी बुधवारी संध्याकाळी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे सुद्धा होते.