बहिष्कार घालणाऱ्या निर्मात्यांना नाटय़ परिषदेचे जोरदार समर्थन
महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात आलेल्या २८व्या व्यावसायिक मराठी नाटय़ स्पर्धेसंबंधात सांस्कृतिक संचालकांनी घातलेल्या अनाठायी घोळाबद्दल अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत त्यांच्या निषेधाचा ठराव संमत करण्यात आला. तसेच या स्पर्धेवर बहिष्कार टाकणाऱ्या सहा नाटय़ निर्मात्यांमागे परिषद खंबीरपणे उभी राहील, असेही जाहीर करण्यात आले.
या ठरावास नाटय़ परिषदेच्या घटक संस्था असलेल्या कलाकार संघ, रंगमंच कामगार संघटना आणि नाटय़ व्यवस्थापक संघाने संपूर्ण पाठिंबा दिला आहे. नाटय़ व्यावसायिक निर्माता संघाचे एक प्रतिनिधीही या बैठकीस उपस्थित होते. मात्र त्यांनी या संबंधात गुळमुळीत भूमिका घेतल्याचे समजते.
शनिवारी दुपारी प्रथम नाटय़ परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यानंतर नियामक मंडळाची बैठक झाली. त्यात नाटय़ निर्मात्या व परिषदेच्या खजिनदार लता नार्वेकर आणि निर्माते प्रसाद कांबळी यांनी नाटय़ स्पर्धेच्या वादासंबंधात आपली भूमिका मांडली. त्यानंतर एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. या संदर्भात सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन सरकारने योग्य तो तोडगा काढावा, असेही ठरावात म्हटले आहे.