सव्‍‌र्हर डाऊन झाल्याने परीक्षा उशिराने;  राज्यशास्त्राच्या प्रवेशपत्रावर परीक्षेची वेळ चुकीची
मुंबई विद्यापीठाच्या विविध परीक्षांच्या आयोजनातील घोळ नव्या कुलगुरूंच्या कार्यकाळातही संपण्याच्या मार्गावर नाही. या घोळाचा फटका गुरुवारी बीए, बी.एस्सी., एमए, एमकॉम च्या विद्यार्थ्यांना बसला.
विद्यापीठाच्या तब्बल १५० परीक्षा गुरुवारी सकाळी ११ वाजता सुरू होणार होत्या. त्या सुरू होण्याच्या दीड तास आधी परीक्षा विभागातून परीक्षा केंद्रांवर म्हणजे महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन प्रश्नपत्रिका पाठविल्या जातात. त्या डाऊनलोड करून त्याच्या फोटोकॉपी काढल्या जातात आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये वाटून परीक्षा घेतली जाते, परंतु प्रश्नपत्रिका पाठविण्याच्या वेळेत म्हणजे सकाळी ९.३०च्या सुमारास परीक्षा विभागाचा ‘सव्‍‌र्हर’च डाऊन झाला. अनेक केंद्रांवर प्रश्नपत्रिका डाऊनलोड होण्यास सुरुवात झाली होती. परंतु सव्‍‌र्हर बंद झाल्याने हे काम ठप्प पडले. परीक्षा केंद्रांवरून दूरध्वनी ठणाणू लागल्यानंतर परीक्षा विभागाने ई-मेलद्वारे प्रश्नपत्रिका पाठविल्या. या खटाटोपात बराच वेळ वाया गेला. त्यामुळे अनेक ठिकाणी परीक्षा सुरू होण्यास उशीर झाला. तब्बल २५ हजार विद्यार्थी या परीक्षांना बसले होते.
दुपारच्या सत्रात तर याहून अधिक गंभीर घोळाला ‘दूर व मुक्त अध्ययन शिक्षण संस्थे’च्या (आयडॉल) राज्यशास्त्र विषयाच्या (भाग-२) विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागले. त्यांची गुरुवारी ‘स्टेट पॉलिटिक्स इन इंडिया’ या विषयाची परीक्षा होणार होती. १४ परीक्षा केंद्रांवर २८९ विद्यार्थी तिला बसणार होते. मूळ वेळापत्रकानुसार परीक्षा सकाळी ११ वाजता होती. परंतु, प्रवेशपत्रावर ही वेळ दुपारी ३ अशी छापली होती. त्यामुळे विद्यार्थी दुपारी परीक्षा केंद्रांवर पोहोचले, परंतु परीक्षा सकाळीच झाल्याचे समजताच त्यांच्या तोंडचे पाणीच पळाले. प्रवेशपत्रामुळे हा घोळ झाल्याचे लक्षात येताच महाविद्यालयांनी परीक्षा विभागाशी संपर्क साधला. एक प्रश्नपत्रिका सकाळीच परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात आली होती. त्यामुळे याच विषयाची दुसरी प्रश्नपत्रिका केंद्रांवर पाठवून मग परीक्षा पार पडली.
परीक्षा विभागाचे नियंत्रक दीपक वसावे यांनी सव्‍‌र्हर डाऊन झाल्याचे मान्य केले. मात्र ज्या ठिकाणी परीक्षा उशिरा सुरू झाली, त्या ठिकाणी वेळ वाढवून दिल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांचीही नव्याने परीक्षा घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

परीक्षा विभागाच्या गोंधळामुळे राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यामुळे या घोळाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी.
– प्रदीप सावंत, माजी सिनेट सदस्य आणि युवा सेना नेते