भाजपने रिपब्लिकन पक्षाला सोडलेल्या आठ जागांचा अजूनही घोळ सुरु आहे. काही जागांवर भाजपचेच उमेदवार आहेत, तर अनेक ठिकाणी एबी फॉर्म न मिळाल्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना अपक्ष म्हणून अर्ज भरावे लागले आहेत. एका मतदारसंघातील उमेदवार शिवसेनेने पळवला तर, रिपाइंमधील फुटीनंतर आणखी एका मतदारसंघातील उमेदवार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे समजते.  
भाजपने रिपाइंला विधानसभेच्या आठ जागा देण्याचे मान्य केले. त्यानुसार २७ सप्टेंबरला रिपाइंच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या यादीत चेंबूर, विक्रोळी, मुंब्रा, भांडूप, अंबरनाथ, पिंपरी, पुणे व देवळाली या मतदारसंघांचा समावेश होता. २९ सप्टेंबरला प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतून पुणे, भांडूप व मुंब्रा हे मतदारसंघ गायब झाले. त्याजागी मानखुर्द-शिवाजीनगर, मेहकर व देगलूर हे मतदारसंघ आले. त्यातही चेंबूर, विक्रोळी व पिंपरी या मतदारसंघातील उमेदवारांनी रिपाइंचे एबी फॉर्म भरल्याने ते अधिकृत उमेदवार झाले आहेत. मेहकरमध्ये रिपाइंचा जिल्हाध्यक्षच भाजपचा उमेदवार आहे.
अंबरनाथमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांला रिपाइंचा उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. पुण्याच्या रिपाइंच्या कार्यकर्त्यांला शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. मुंबईतील एक उमेदवारही शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे कळते. आज बुधवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. त्यानंतर रिपाइंच्या वाटय़ाला नेमक्या किती जागा आल्या आहेत, हे स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले.