मध्य रेल्वेच्या हद्दीतील दुपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी कासू ते नागोठणे स्थानकांदरम्यान येत्या बुधवारी दुपारी १२.५० ते सायंकाळी ५.५० या कालावधीत जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे बुधवारी सकाळी दिवा-रोहा ही पॅसेंजर कासू स्थानकापर्यंत जाईल. तर इतर मेल-एक्स्प्रेस गाडय़ा दोन तास उशिराने धावतील.
कासू ते नागोठणेदरम्यान दुपदरीकरणाचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे. कासू-नागोठणे या ५०० मीटर टप्प्यांदरम्यान एकूण दीड किलोमीटर मार्ग वळणाचा आहे. येथे दुपदरीकरणासाठी सध्याची मार्गिका सरळ केली जाणार असून त्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. बुधवारी २ डिसेंबर रोजी दुपारी १२.५० वाजल्यापासून हे काम सुरू होणार आहे. त्यामुळे ब्लॉक काळात सकाळी ९.१० ला दिव्याहून सुटणारी दिवा-रोहा ही पॅसेंजर गाडी कासू येथे रद्द केली जाईल. तर दुपारी ४.१० वाजता कासू स्थानकातून सुटणारी गाडी रोहा येथे रद्द केली जाईल. त्यामुळे अनेक गाडय़ांचे वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तर मेल व एक्स्प्रेस गाडय़ांची वाहतूक अर्धा ते दोन तास उशिराने होईल.