कोकणात जाणाऱ्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरणाच्या तयारीचा भाग म्हणून मध्य रेल्वेतर्फे येत्या १० दिवसांत पाच तासांचा जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. आपल्या हद्दीतील पनवेल ते कासू या स्थानकांदरम्यान मध्य रेल्वे हा ब्लॉक घेणार आहे.
कोकणात जाण्यासाठी सध्या एकच मार्गिका असल्याने या मार्गावरील वाहतुकीसाठी वेळ लागतो. अनेकदा काही गाडय़ा सायडिंगला काढल्या जातात. यावर उपाय म्हणून कोकणात जाणाऱ्या मार्गाचे दुपदरीकरण करण्याचा प्रस्ताव गेली अनेक वर्षे चर्चेला होता. कोकण रेल्वेने आपल्या हद्दीत या दुपदरीकरणाचे केवळ सर्वेक्षण केले असताना मध्य रेल्वेने आघाडी घेत दुपदरीकरणाचे कामही चालू केले आहे. या कामातील एका महत्त्वाच्या टप्प्यासाठी पनवेल-कासू या दरम्यान येत्या दहा दिवसांत ब्लॉक घेण्यात येईल. सध्या चालू असलेल्या एकाच रेल्वेमार्गाची जागा बदलण्याचे काम होणार आहे. त्यामुळे दुसरा रेल्वेमार्ग टाकायला जागा उपलब्ध होणार आहे, असे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांनी सांगितले. कोकणातून परतणाऱ्या विशेष गाडय़ांची गर्दी असल्याने पुढील मंगळवारी ब्लॉक घेण्याबाबत विचार चालू असल्याचेही निगम यांनी स्पष्ट केले.