रुग्णसंख्या कमी असल्यामुळे पालिकेचा निर्णय; मनुष्यबळही कमी करण्याचे आदेश

शैलजा तिवले

मुंबई:  सध्या रुग्णसंख्या कमी असल्याने वांद्रे कुर्ला संकुलातील (बीकेसी) मोठय़ा करोना रुग्णालयांसह दहिसर आणि मुलुंड येथील करोना रुग्णालयही आणखी काही दिवस रुग्ण सेवेकरिता बंदच ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तसेच या रुग्णालयातील मनुष्यबळही कमी करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत.

एकीकडे राज्यातील करोना कृतिदलाने पुढील दोन ते चार आठवडय़ात करोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा दिलेला असताना पालिकेने मात्र मनुष्यबळ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा दुसऱ्या लाटेप्रमाणेच तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या काळात डॉक्टर आणि परिचारिकांचा पुन्हा तुटवडा भासण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संजीव जयस्वाल यांची बदली झाल्याने मुंबईतील सहा मोठय़ा करोना रुग्णालयांच्या कामकाजाची जबाबदारी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. जबाबदारी घेतल्यानंतर काकाणी यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या बैठकीत सर्व मोठय़ा करोना रुग्णालयांचा आढावा घेतला.

तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर बीकेसी, मुलुंड आणि दहिसर करोना रुग्णालयांमधील सर्व रुग्ण अन्यत्र हलवून ही रुग्णालये तात्पुरत्या काळासाठी पालिकेने बंद केली होती. त्यानंतर पावसाळ्याची दुरुस्ती सुरू असल्याचे सांगत ही रुग्णालये पुन्हा रुग्णसेवेसाठी खुली केलेली नाहीत. परंतु आता याला महिना उलटत आला तरी पालिकेने ही रुग्णालये अद्याप सुरू केलेली नाहीत.

‘सध्या गोरेगावचे नेस्को आणि मरोळचे सेव्हन हिल्स करोना रुग्णांसाठी सुरू आहेत. नेस्कोची क्षमता सुमारे साडेतीन हजार खाटांची आहे आणि तिथे साधारण दोनशे रुग्ण दाखल आहेत. तेव्हा रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे सर्व मोठी करोना रुग्णालये सुरू करण्याऐवजी सध्या सुरू असलेल्या रुग्णालयांमधील रुग्णसंख्या साधारण ५० ते ६० टक्कय़ांपर्यंत पोहचल्यावर बीकेसी, मुलुंड आणि दहिसर ही तीन रुग्णालये पुन्हा कार्यरत करण्याचा निर्णय पालिके ने घेतला आहे. मात्र या रुग्णालयांतील प्राणवायू, स्वच्छता, अग्निशमन इत्यादी व्यवस्थापन सेवा सुरूच राहतील. मनुष्यबळही इतक्या मोठय़ा प्रमाणात बसवून ठेवण्यापेक्षा आवश्यक तेवढे मनुष्यबळ ठेवून अन्य कर्मचाऱ्यांना कमी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. एक किंवा दोन महिने या कर्मचाऱ्यांना आराम द्या आणि त्यांनाच पुन्हा सेवेत घ्या,  असेही सूचित केल्याचे काकाणी यांनी सांगितले.

करोना कृती दलाने बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये पुढील दोन ते चार आठवडय़ात तिसरी लाट येण्याची संभाावना व्यक्त के ली होती. तसेच या लाटेत दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक रुग्णसंख्या वाढेल, असेही सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने मोठय़ा करोना रुग्णालयातील मनुष्यबळ कमी करण्याच्या निर्णय कितपत योग्य आहे, अशी चर्चा सध्या होत आहे.

‘मनुष्यबळ कमी करणे अयोग्य’

पहिल्या लाटेनंतर पालिकेने मोठय़ा करोना रुग्णालयातील जवळपास ५० टक्क्यांहूनही अधिक मनुष्यबळ कमी केले. कंत्राट संपलेले डॉक्टर आणि परिचारिकांची मुदत पुन्हा वाढविली नाही. अचानकपणे दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढल्यावर मात्र या रुग्णालयांची चांगलीच तारांबळ उडाली. मुदत न वाढविल्यामुळे हे डॉक्टर आणि परिचारिका अन्य ठिकाणी रूजू झाले. त्यामुळे ६० रुग्णांमागे एका परिचारिकेला काम करण्याची वेळ आली. तेव्हा मनुष्यबळ विशेषत: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका पुन्हा मिळणे कठीण होत असल्यामुळे थोडय़ा कालावधीसाठी कमी करण्याचा निर्णय योग्य नाही. याचे दुष्परिणाम तिसऱ्या लाटेच्या वेळेस अनुभवायला मिळतील, अशी भीती रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

लसीकरण सुरू

सध्या पालिकेच्या सूचनेनुसार रुग्णालय पूर्णपणे बंदच आहे. मनुष्यबळ कमी करण्याच्या सूचना दिल्यामुळे जवळपास ६० ते ७० टक्के मनुष्यबळ कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असे मुलुंडच्या करोना रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप आंग्रे यांनी सांगितले. तर रुग्णालय बंद असले तरी लसीकरण सुरू आहे. त्यामुळे लसीकरणासह जवळपास ३०० खाटांसाठी आवश्यक मनुष्यबळ वगळून अन्य मनुष्यबळ कमी करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे बीकेसी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी सांगितले.

सध्या उपलब्ध मनुष्यबळ

  • बीकेसी करोना रुग्णालयाची क्षमता २ हजार ३२८ खाटांची आहे. यात  ८९६ प्राणवायू खाटा आणि, १२ डायलिसिस युनिट आहेत. यासाठी रुग्णालयात १ हजार ३९९ कर्मचारी असून ३९५ डॉक्टर, २९९ परिचारिका, ३०५ वॉर्डबॉय यांचा समावेश आहे.
  • मुलुंडच्या रुग्णालयात १ हजार ७०८ खाटा आहेत. यात ९६९ प्राणवायू खाटा आहेत. रुग्णालयात ४३६ कर्मचारी असून यात १०३ डॉक्टर, १०५ परिचारिका आणि ९० वॉर्डबॉय आहेत.
  • दहिसर रुग्णालयात १ हजार ६१ खाटा असून यात ६७२ प्राणवायू खाटा आहेत. यासाठी ५२० कर्मचारी असून १०० डॉक्टर, १५० परिचारिका आणि ६० वॉर्डबॉय आहेत.