आपल्या विविध मागण्यांसाठी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याच्या पावित्र्यात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून त्यांच्या मागण्यांचे प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाच्या सह सचिवांनी आंदोलनकर्त्यांना दिली. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयील शिक्षक महासंघातर्फे त्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले होते.
कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या विविध मागण्या प्रलंबित असून त्यासंदर्भात मागच्या वर्षी ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन शालेय शिक्षण विभागतर्फे देण्यात आले होते. मात्र अद्याप यावर कोणताही निर्णय न झाल्याने शिक्षकांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले असून या संदर्भात त्यांनी फेब्रुवारी २०१४मधील बारावीच्या परीक्षांच्या कामकाजावरील बहिष्कारापर्यंतची आपली आंदोलनाची दिशा ठरविली आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शासनातर्फे शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव प्रकाश ठुबे यांनी महासंघाचे निवेदन स्वीकारले व त्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक विचार करत असून त्यांच्या मागण्याचे प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे असल्याची माहिती दिल्याचे महासंघाचे सरचिटणीस अनिल देशमुख यांनी सांगितले.