कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी उद्या (सोमवार ३० डिसेंबर) आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारने शिक्षकांच्या वेतनविषयक विविध मागण्या पूर्ण न केल्यास बारावीच्या परीक्षाविषयक कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.
राज्य सरकारने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेला दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे शिक्षक मैदानात उतरणार आहेत. या करिता सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास शिक्षक ‘याद करो सरकार’ आंदोलन करतील. याआधी शिक्षकांनी राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे धरून आंदोलन केले होते. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणीही शिक्षकांनी आंदोलन करून आपली नाराजी व्यक्त केली होती.