मुंबई : प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून कामकाज पाहणारे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांची उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने त्याबाबत केलेली शिफारस केंद्र सरकारने मंजूर केली.

उच्च न्यायालयावर बाहेरच्या राज्यातून मुख्य न्यायमूर्ती म्हणून नेमणूक करण्याची प्रथा आहे. मात्र निवृत्त न्यायमूर्ती सुजाता मनोहर आणि निवृत्त न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्यानंतर न्यायमूर्ती धर्माधिकारी यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची ही तिसरी वेळ आहे. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग २४ फेब्रुवारी रोजी निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती धर्माधिकारी यांची प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी न्यायमूर्ती धर्माधिकारी यांचीच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तिपदी नियुक्ती करावी, अशी शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने केंद्र सरकारकडे केली होती. न्यायमूर्ती धर्माधिकारी हे २८ एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांनाच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तिपदी नियुक्त करण्याची शिफारस न्यायवृंदाने केली होती. बुधवारी केंद्र सरकारने न्यायवृंदाची शिफारस मान्य करत न्यायमूर्ती धर्माधिकारी यांची उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केले.