न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणातील खटल्यात सुप्रीम कोर्टाने ज्या दिवशी निकाल दिला त्या दिवसाला काळा दिवस संबोधणारे मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील यांनी स्वतःच्या हत्येचीही शंका उपस्थित केली आहे. जनसत्ताने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मुंबई हायकोर्टाच्या माजी न्यायाधीशांची संघटना ‘अलायंस फॉर जस्टिस अॅण्ड पीस’द्वारे आयोजित न्यायाधीशांच्या परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत ‘लोकशाहीची सुरक्षा’ या विषयावर चर्चा सुरु होती. सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणाची सुनावणी घेणारे न्या. लोया यांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. लोयांच्या व्यतिरिक्त त्यांचे दोन सहकारी अॅड. श्रीकांत खंडाळकर आणि निवृत्त न्या. प्रकाश ठोंबरे यांची देखील हत्या करण्यात आली आहे. ही कोणतीही दुर्घटना नव्हती. त्यामुळेच आता पुढचा नंबर माझा असणार आहे.

न्या. पाटील म्हणाले, काहीही झाले तरी मी अन्यायाविरोधात खरं बोलण्यापासून मागे हटणार नाही. खरं बोलण्यापासून कधीही घाबरणार नाहीत. आपल्याला सातत्याने घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आपल्यावर कधीही हल्ला होऊ शकतो.

कोळसे पाटील पुढे म्हणाले, भारतात अल्पसंख्यांक, आदिवासी, दलित आणि गरीब लोक खूपच भितीदायक वातावरणात जगत आहेत. त्यांच्या मुलभूत अधिकारांचे हनन होत आहे. जातीय घटकांनी सध्या लोकशाहीच्या सर्व घटकांवर कब्जा केला आहे. मात्र, तरीही देशाचे संविधान सर्वांना समान अधिकार देत आहे. त्यामुळे कुठेही अन्याय झाला तर लोकांनी आवाज उठवायला हवा. खरं बोलण्यापासून घाबरू नये. जर जनताच आपल्या अधिकारांसाठी रस्त्यावर उतरली तर तुरुंगही कमी पडतील. लोकांनी संविधानिक चौकटीत राहून आपले अभियान चालवायला हवे. मी देखील देशभर ‘लोकशाही वाचवा, देश वाचवा’ हे आंदोलन चालवत आहे.