शहरी नक्षलवादाप्रकरणी अटकेत असलेले कार्यकर्ते वेर्णन गोन्साल्विस यांच्याकडून हस्तगत केलेल्या पुस्तकांच्या यादीत थोर रशियन साहित्यिक-विचारवंत लिओ टॉलस्टॉय यांच्या ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’चा नव्हे, तर बिस्वजीत रॉय यांच्या ‘वॉर अ‍ॅण्ड पीस इन जंगलमहल- पीपल, स्टेट अ‍ॅण्ड माओईस्ट’ या पुस्तकाचा समावेश होता.  लिओ टॉलस्टॉय यांचे ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’ हे अभिजात साहित्य आहे. त्याविषयी आपल्याला माहीत आहे, असे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

हस्तगत केलेले सगळे साहित्य गंभीर पुरावा असल्याचे मत आपण मांडले नव्हते, तर ते गंभीर पुरावा नाहीत हे सिद्ध करण्याबाबत विचारणा केली होती. परंतु त्यावरून जे काही झाले ते त्रासदायक आहे, अशी खंतही गोन्साल्विस यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी ऐकणारे न्या. कोतवाल यांनी व्यक्त केली.

व्यवस्थेविरोधी साहित्याचा समावेश असलेली पुस्तके आणि सीडी गोन्साल्विस यांच्या घरातून हस्तगत करण्यात आल्याची माहिती बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाला देण्यात आली. त्याच वेळी त्याची यादीही न्यायालयात सादर करण्यात आली. ही पुस्तके गंभीर पुरावा असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. ‘मार्क्‍सिस्ट अर्काईव्हज’, ‘जय भीम कॉम्रेड’, ‘अंडरस्टॅण्डिंग माओइस्ट’, ‘आरसीपी रिव्ह्य़ू’, ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’, कबीर कला मंचचे ‘राज्य दमन विरोधी’, अशी यादीतील पुस्तकांची नावे वाचली गेली. त्यावर ‘राज्य दमन विरोधी’ या सीडीच्या शीर्षकातून त्यातील साहित्य व्यवस्थेविरोधी असल्याचे सूचित करते. तर ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’ हे पुस्तक अन्य देशांतील युद्धाविषयी आहे. अशी पुस्तके आणि सीडी आपल्या घरी का ठेवली? त्यामागील नेमके कारण काय? अशी विचारणा करताना त्याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. न्यायालयाने केलेल्या या विचारणेशी संबंधित वृत्त समाजमाध्यमांतून वाऱ्यासारखे पसरले. शिवाय प्रसारमाध्यमांनी हे वृत्त प्रसिद्ध केले.

त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सुनावणी झाली असता गोन्साल्विस यांच्याकडून दोन हजार पुस्तके हस्तगत करण्यात आली आणि त्यातील एकाही पुस्तकावर बंदी नाही, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली. तर सहआरोपी सुधा भारद्वाज यांच्या वकिलाने आधीच्या सुनावणीत न्यायालयाने उल्लेख केलेले पुस्तक हे बिस्वजीत रॉय यांचे होते आणि ‘वॉर अ‍ॅण्ड पीस जंगलमहल- पीपल, स्टेट आणि माओईस्ट’ असे त्याचे शीर्षक असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायमूर्ती कोतवाल यांनी बुधवारच्या सुनावणीत आपण आरोपपत्राचा भाग असलेल्या पुस्तकांची यादी वाचत होतो. ही यादी फार वाईट हस्ताक्षरांत लिहिली गेली होती. ज्या ‘वॉर अ‍ॅण्ड वॉर’ पुस्तकाचा उल्लेख केला होता तो टॉल्सटॉय यांच्या नव्हे, तर बिस्वजीत रॉय यांच्या पुस्तकाबाबतचा होता. टॉल्सटॉय यांच्या ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’बाबत आपल्याला माहीत आहे. तसेच आपण केलेली विचारणा ही पोलिसांनी पुरावा म्हणून सादर केलेल्या यादीतील सगळ्या पुस्तकांबाबत होती, असे न्यायमूर्ती कोतवाल यांनी म्हटले. यादी मराठीत होती. त्यामुळे ती वाचण्यासाठी मदत करत होते. शिवाय माओ-अध्ययनाचे युद्ध कोणासाठी? कशासाठी? ‘वॉर’ या शब्दाचा उल्लेख त्यासाठी होता. ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’ असा उल्लेख जरी केला गेला असला तरी तो टॉल्सटॉय यांच्या पुस्तकाबाबत नव्हता, असे स्पष्ट करत जे झाले ते सगळे त्रासदायी आहे, असेही त्यांनी प्रामुख्याने नमूद केले.

दरम्यान, आपल्याकडे सापडलेली पुस्तके  अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहेत. ती हस्तगत करेपर्यंत पोलिसांना बहुधा या पुस्तकांविषयी माहीत नसावे. परंतु ही पुस्तके आपल्याडे सापडली वा ती आपण बाळगली याचा अर्थ आपला बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी संबंध असल्याचे सिद्ध करत नाही, असा दावा गोन्साल्विस यांनी केला.