संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या पत्रकार जे.डे.हत्या प्रकरणात आज अखेर सात वर्षांनी निकाल लागला. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह नऊ जणांना विशेष मोक्का न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात जिग्ना वोरा या महिला पत्रकाराला अटक झाल्याने त्यावेळी सर्वांनाच धक्का बसला होता. अंडरवर्ल्डशी तसे महिलांचे कनेक्शन पूर्वीपासून आहे. पण एका पत्रकाराच्या हत्या प्रकरणात दुसऱ्या महिला पत्रकाराला अटक होणे ही चक्रावून टाकणारी बाब होती. दरम्यान जिग्नाला आता या प्रकरणात दिलासा मिळाला असून तिची निर्दोष सुटका झाली आहे.
११ जून २०११ रोजी पवई हिरानंदानी येथे दिवसाढवळया जे.डे यांची गोळया झाडून निर्घुण हत्या करण्यात आली. त्यानंतर २५ नोव्हेंबर २०११ रोजी जिग्ना वोराला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात जिग्ना छोटा राजनसह मुख्य आरोपी होती. एशियन एजमध्ये पत्रकार असणारी जिग्ना या घटनेच्यावेळी ३७ वर्षांची होती. जे. डे यांच्या बाईकची नंबर प्लेट, पत्ता ही माहिती तिने छोटा राजनला दिल्याचा तिच्यावर आरोप होता. जिग्नाविरोधात परिस्थितीजन्य पुरावे सापडले होते.
जिग्नाने छोटा राजनला तीन फोन कॉल्स केल्याचा तिच्यावर आरोप होता. जिग्नाने मुलाखतीसाठी छोटा राजनला फोन कॉल्स केले होते असे एशियन एजच्या संपादकांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. व्यावसायिक शत्रुत्वातून जे.डे.ची हत्या करण्यासाठी मला जिग्न वोराने भडकवले असा दावा त्यावेळी छोटा राजनने केला होता. जे.डे. मिड डे आणि जिग्ना वोरा एशियन एजमध्ये होते. दोन वेगवेगळया इंग्रजी दैनिकांमध्ये क्राईम बीट पाहायचे. दोघे परस्परांना ओळखत असले तरी त्यांच्यामध्ये स्पर्धा होती असे त्यावेळी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते.
राजनचा दावा मिड डे चे कार्यकारी संपादक सचिन कालबाग यांनी खोडून काढला होता. जिग्ना वोरा जे.डे. यांना खूप ज्यूनियर होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्पर्धा असण्याचा कुठला प्रश्नच नव्हता असे मिड डे चे कार्यकारी संपादक सचिन कालबाग यांनी इंडिया टुडेला सांगितले होते. जिग्नाची २७ जुलै २०१२ रोजी जामिनावर सुटका झाली. जिग्ना सिंगल पॅरेंट होती. त्याच आधारावर तिला जामीन मंजूर झाला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 2, 2018 5:42 pm