सध्या ई-कॉमर्सचा मोठा बोलबाला आहे. घरबसल्या शॉपिंग करण्याकडे अनेकांचा कल वाढत असून त्यामध्ये मिळणारी सूट आणि उत्तम सेवा याला सर्वच जण आकर्षित होत आहे. यामुळेच ई-कॉमर्सची उलाढाल अल्पावधीतच करोडो डॉलर्सपर्यंत पोहचली. पण या सर्वात छोटे व्यापारी मात्र गटांगळय़ा खाऊ लागले. अनेकांवर व्यवसाय बंद करायची वेळ आली, तर अनेकांनी आपले व्यवसाय ई-कॉमर्स संकेतस्थळांशी कसे जोडता येतील याचा विचार सुरू केला. पण त्यांना बडय़ा ई-कॉमर्स कंपन्यांच्या अटी पूर्ण करणे शक्य होत नव्हते. अशा छोटय़ा व्यापाऱ्यांना त्यांच्याबरोबरच छंद म्हणून कलेतून व्यवसाय करणाऱ्यांना https://kraftly.com/ ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

पिट्सबर्ग विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेल्या साहिल गोएल यांनी विमा आणि रिटेल क्षेत्रात काम केल्यानंतर २०११मध्ये कार्ट रॉकेट नावाच्या एका कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून विविध कंपन्यांसोबत काम करत असताना त्यांना अनेकदा छोटे उद्योग या सर्वापासून दूर राहात असल्याची खंत वाटत होती. हेच लक्षात घेऊन साहिल यांनी ऑनलाइन नसलेल्या छोटय़ा व्यापाऱ्यांना जागतिक पातळीवर पोहचवण्यासाठी  https://kraftly.com/  हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. या संकेतस्थळाच्या माध्यमातून छोटय़ा व्यापाऱ्यांबरोबरच छंदातून व्यवसाय करणारे आणि स्वयंसेवी संस्थांनाही त्यांची उत्पादने विकण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले आहे.

हे संकेतस्थळ सुरू करतानाच एक मोबाइल अ‍ॅपही कंपनीने सुरू केले आहे. या मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून विक्रेता आणि ग्राहक या दोघांना एकमेकांशी थेट संपर्क साधता येतो. या अ‍ॅपमध्ये कोणत्याही मोठय़ा ब्रँडला स्थान नसल्यामुळे सर्वच स्थानिक ब्रँडस मोठय़ा प्रमाणावर दिसतात. तसेच इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सनाही या संकेतस्थळावर स्थान दिले जात नाही. अशा स्थानिक व्यापाऱ्यांनी क्राफ्टली या संकेतस्थळावर आपले उत्पादन अपलोड करण्यासाठीही सोपी पद्धत ठेवण्यात आली आहे. व्यापाऱ्याने आपले नाव आणि उत्पादनाचा तपशील भरून त्याचे एक छायाचित्र काढून ते अ‍ॅपवर अद्ययावत करावयाचे आहे. हे अद्ययावत झाले की त्यांना विविध सेवा पुरविल्या जातात. ज्यामध्ये क्राफ्टलीच्या संकेतस्थळाशी त्यांचे नाव जोडून एक संकेतस्थळासारखी जागा दिली जाते. जेणेकरून त्या व्यापाऱ्याचे नाव आणि त्याच्या ब्रँडचे नाव लोकांपर्यंत पोहचेल. याचबरोबर व्यापारी अ‍ॅपच्या माध्यमातून आपली उत्पादने व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवरही पोस्ट करू शकतो. यामध्ये ग्राहक त्यांना पाहिजे ते उत्पादन अवघ्या तीस सेकंदांच्या आत विकत घेऊ शकतो, असा दावा साहिल यांनी केला आहे.

हा व्यवहार करत असताना कंपनी व्यापाऱ्याला कुरिअर सेवाही पुरविते. अनेकदा छोटे व्यापारी किंवा छंद म्हणून व्यापार करणाऱ्यांना महिन्यातून एक ते दोन वेळा ऑर्डर मिळते यामुळे अनेकदा त्यांच्याकडे वस्तू पोहचवण्यासाठी व्यवस्था नसते. अशा वेळी कंपनीच्या या सेवेचा फायदा ते माफक दरात घेऊ शकतात.

गुंतवणूक आणि उत्पन्न स्रोत

ही कंपनी व्यापाराच्या तत्त्वांचे तंतोतंत पालन करत असल्यामुळे निधी उभारणीसाठी यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. याचबरोबर कार्टरॉकेट या व्यवसायांना जोडणाऱ्या संकेतस्थळाच्या माध्यमातूनही कंपनीला उत्पन्न होत असते. क्राफ्टली या अ‍ॅपच्या माध्यमातून व्यापाऱ्यांकडून कंपनी प्रत्येक व्यवहारामागे पाच टक्के वाटा घेते. याचबरोबर क्राफ्टली ही कंपनी व्यापाऱ्यांना विविध सेवाही देते, या सेवांचे वेगवेगळे पैसे आकारले जातात. यातून कंपनीला उत्पन्न होत असते. याचबरोबर कंपनीतर्फे कधीही कोणती ऑफर दिली जात नाही. जर विक्रेत्याला ऑफर ठेवायची असेल तर ते ठेवू शकतात. यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी समाज माध्यमांचा वापर होत असल्याचे साहिल सांगतात.

भविष्यातील वाटचाल

सध्या या अ‍ॅपवर दीड हजारहून अधिक प्रकारांतील सहा लाखांहून अधिक उत्पादने उपलब्ध आहेत. भविष्यात उत्पादनांची ही संख्या वाढवायची असून विक्रेत्यांनी संख्याही वाढवण्याचा विशेष प्रयत्न असल्याचे साहिलने सांगितले.

नवउद्यमींना सल्ला

नवीन व्यवसाय करत असताना तुमचा व्यवसायाचा पाया भक्कम असला पाहिजे. जर तसे असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल, असा सल्ला साहिल यांनी नवउद्यमींना दिला आहे. याचबरोबर तुम्ही जे काही करत आहात ते इतरांपेक्षा वेगळे आणि कल्पक असायला हवेत, असेही साहिलने नमूद केले.

@nirajcpandit