प्रशांत ननावरे

सणावाराला केल्या जाणाऱ्या पक्वान्नांत श्रीखंड-पुरीला विशेष मान आहे. तसे वेलची, केशर, ड्रायफ्रूट्स, आम्रखंड, पिस्ता, राजभोग श्रीखंड सर्वानी चाखलेलं असतं. पण या चवींपलीकडेही श्रीखंडाच्या विविध प्रकारांचा आस्वाद घ्यायचा असेल, तर कांदिवलीतील ‘ऊंचा ओटलावाला’ला भेट द्यायलाच हवी. इथं श्रीखंडांचे तब्बल पंचवीस प्रकार उपलब्ध आहेत.

मनहरलाल चुनिलाल दुधारा हे मूळचे गुजरातच्या आणंद जिह्य़ाजवळील खंबातचे रहिवासी. त्यांनी गुजरातमध्ये सुरू केलेला हा व्यवसाय पुढे जयेश शाह या त्यांच्या मुलाने आणि आता नातू कौशल शहाने सांभाळला आणि वाढवला.

ऊंचा ओटलावालाचं श्रीखंड इतर कंपन्यांच्या श्रीखंडापेक्षा दिसायला आणि चवीलाही वेगळं आहे. ते नुसतंच आइसस्क्रीमसारखंही खाल्लं तरी उत्तम लागतं. १९६७ साली श्रीखंड तयार करायला सुरुवात झाली तेव्हापासूनचे रोझ, पिस्ता आणि बदाम हे तीन फ्लेवर्स आजही कायम आहेत. पण मग नंतर लोकांच्या आवडीनुसार फ्लेवर्स तयार केले गेले. ते तयार करताना त्यामध्ये रंगाचा वापर केला जात नाही. तर ताज्या फळांचा गर वापरला जातो. वेगवेगळ्या फळांनुसार साखरेचं प्रमाण आणि त्यावर केली जाणारी प्रक्रिया ठरलेली आहे. शिवाय श्रीखंडाचा पोतही जपला जातो.

‘तिरंगा’मध्ये रोझ, पिस्ता आणि बदाम अशी तीन प्रकारची श्रीखंड असतात. ‘ऊंच ओटलावाला स्पेशल’ श्रीखंडामध्ये ड्रायफ्रूट, चेरी आणि जेली आहेत. त्यामुळे लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वाना ते आवडू शकतं. ‘रेनबो’मध्ये सात रंगांची आणि प्रकारची श्रीखंड असतात. विशेष म्हणजे प्रत्येक फ्लेवरचा एक थर असतो. आंबा, स्ट्रॉबेरी, संत्रे, अननस, सीताफळ, किवी आणि द्राक्ष या फळांचे श्रीखंड तयार केले जाते.

श्रीखंड तयार करण्याची ‘ऊंचा ओटलावाला’ची खास पद्धत आहे. त्यांच्या व्यवसायाचं ते गुपित असल्याने ते कुणालाही सांगितलं जात नाही. मुख्य म्हणजे श्रीखंड कितीही किलो असो, हातानेच तयार केलं जातं. त्यामुळे त्याचा आंबट-गोडपणा आजही तसाच टिकून आहे. त्यामुळे हटके मिष्टान्नाच्या शोधात असाल, तर इथे यायलाच हवं!

ऊंचा ओटलावाला

* कुठे : ३४, राज आर्केड, डी-मार्टच्या समोर, महावीरनगर, कांदिवली (पश्चिम), मुंबई- ४०००६७.

* कधी : सोमवार ते रविवार सकाळी ९ ते रात्री १२.३० वाजेपर्यंत.