12 July 2020

News Flash

खाऊ खुशाल : चिकन वडापाव

चिकनच्या याच वैशिष्टय़ांमुळे सर्व प्रकारच्या पदार्थामध्ये चिकनही सहजपणे सामावून जातं.

(संग्रहित छायाचित्र)

प्रशांत ननावरे

मांसाहारी पदार्थ म्हटलं की पहिल्यांदा चिकनचं नाव घेतलं जातं. कारण मासे सगळीकडे मिळत नाहीत, मटणाशी अनेकांचं सूत जुळत नाही आणि अंडय़ाचा अनेकांना वास येतो. त्यामुळे सगळीकडे सहज उपलब्ध असणारं, खिशाला परवडणारं, बनवायला सोप्पं, आणि थोडय़ाफार प्रमाणात पनीरचा पोत व दिसण्याकडे झुकणारं म्हणून चिकनला अनेक जण पसंती देतात. चिकनच्या याच वैशिष्टय़ांमुळे सर्व प्रकारच्या पदार्थामध्ये चिकनही सहजपणे सामावून जातं. त्यामुळे मांसाहारी मेन्यू म्हटला की इतर पदार्थासोबत चिकनचा समावेश असतोच. पण आज आपण अशा एका जागेविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांच्या मेन्यूमध्ये फक्त आणि फक्त चिकन आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या ब्रॅण्डचं नावंही ‘नथिंग बट चिकन’ असंच ठेवलंय.

सेठवाला कुटुंबीय दोन दशकांपासून पोल्ट्रीच्या व्यवसायात आहेत. पालघर जिल्ह्य़ातील तलासरी येथे कुक्कुटपालनासोबतच मार्केटमध्ये ताज्या कच्च्या चिकनचा पुरवठा करण्यासाठीची अत्याधुनिक फॅक्टरीही शेजारी आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या यंत्रसामग्री आणि कार्यपद्धतीनुसार येथे रोज हजारो किलो ताजे कच्चे चिकन तयार करून बाजारात विक्रीसाठी पाठवले जाते. त्याच्याच पुढे एक पाऊल टाकत मुस्तफा सेठवाला यांनी २०१३ साली ‘नथिंग बट चिकन’ हा ब्रॅण्ड सुरू केला. कच्च्या चिकनसोबतच चिकनपासून तयार केलेले चांगल्या प्रतीचे वेगवेगळ्या प्रकारचे ताजे पदार्थ एकाच ठिकाणी उपलब्ध असावेत हा उद्देश यामागे होता. विशेष म्हणजे इथे चिकनचे कुठलेच फ्रोझन पदार्थ विकले जात नाहीत. तरीही त्यांच्या कोणत्याच शाखेत गेल्यावर कच्च्या चिकनचा नाक मुठीत धरावा असा वास येत नाही. पदार्थाची काचेच्या कपाटांमध्ये पद्धतशीर मांडणी केलेली पाहायला मिळते आणि पाहताचक्षणी तोंडाला पाणी सुटतं.

‘नथिंग बट चिकन’चा मेन्यू अतिशय वेगळा आहे. यात चिकन सलाड, कबाब, कटलेट, बर्गर पॅटी, खिमा, सॅण्डविच, व्रॅप, चिकन मिल बॉक्स, भाताचे प्रकार या तयार पदार्थासोबतच ताबडतोब केवळ मायक्रोव्हेवमध्ये गरम करून खाता येतील असे सलामी, सॉसेजेस आणि हॉट डॉगचा समावेश होतो. बाजारात क्वचितच उपलब्ध असेल असं पाच ते सहा प्रकारचं ताबडतोब बनवता येईल, असं वेगवेगळ्या प्रकारचं मसाला लावून तयार असलेलं चिकनही मिळतं. स्वत:च्या पद्धतीने चिकन बनवून खायचं असेल तर चांगल्या प्रतीचं कच्चं चिकनही आहेच. तऱ्हेतऱ्हेचे चिकन लेग, बोनलेस चिकन, चिकन ड्रमस्टिक्स आणि खिमा हे अतिशय वाजवी दरात उपलब्ध आहे.

इथलं मुख्य आकर्षण म्हणजे ‘चिकन वडापाव’. मुस्तफा यांनी २०१४ साली मुंबईची ओळख असलेल्या ‘वडापाव’ला दिलेला हा मांसाहारी पर्याय होय. खूप संशोधन करून आणि मुंबईकरांची वडापावची आवड लक्षात घेऊन याची निर्मिती करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातला वडा हा वडय़ाच्या भाजीत चिकन आणि त्यावर पीठाचा थर असा सरळधोपट मुळीच नाही. पावाच्या आतला वडा म्हणजे बोटाच्या जाडीची गोल पॅटी आहे. ही पॅटी केवळ चिकन आणि विशिष्ट मसाले यांच्या मिश्रणातून तयार केली जाते आणि ऑलिव्ह ऑइलवर भाजली जाते. प्रथम पावाच्या एका बाजूला सेझवान चटणी आणि दुसऱ्या बाजूला फॅक्टरीमध्येच तयार करण्यात आलेला चीज सॉस लावून मध्ये चिकन पॅटी ठेवून ‘चिकन वडापाव’ सव्‍‌र्ह केला जातो आणि हा चिकन वडापाव किमतीला पूर्ण न्याय देणारा आहे.

त्यातच गव्हाच्या पीठाचा पाव निवडण्याचा आणि जास्तीचं चीज टाकण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. केवळ चिकनपासून बनवलेली आणि रोस्ट केलेली पॅटी असल्यामुळे हा वडापाव खाऊनही पोट जड होत नाही. पॅटीसाठी वापरण्यात आलेला मसाला ही त्यांची ठेवणीतली रेसिपी आहे आणि हे पहिल्या घासापासूनच लक्षात येतं. सोबतच चिकन सीख पाव, देसी बर्गर आणि चिकन खिमा पाव हेही पर्याय उपलब्ध आहेत.

पाच वेगळ्या प्रकारची चिकन सॅलॅड येथे मिळतात. चिकन, भाज्या आणि सॉस यांच योग्य मिश्रण असलेली ही सॅलॅड चविष्ट आहेत. सॅलॅड दिवसभर ताजी रहावीत यासाठी त्यात चिकनसोबत केवळ लाल आणि पिवळ्या रंगाची सिमला मिरची, ऑलिव्हज आणि प्रमाणात सॉसचा वापर केला जातो. मुख्य म्हणजे त्यातील चिकनचं प्रमाण वाखाणण्याजोगं आहे. त्याव्यतिरिक्त गलोटी आणि क्लासिक सीख कबाब आवर्जून खाण्यासारखे आहेत.

इथला प्रत्येक पदार्थ हा वजनावर मिळतो. तुमच्या गरजेप्रमाणे वजन ठरवता येतं. अमुक इतक्याच वजनात पदार्थ दिले जातील अशी अडवणूक केली जात नाही. जवळपास सर्वच पदार्थाच्या पाव किलोची किंमत पावणेदोनशेच्या घरात आहे. ज्यामध्ये एका कुटुंबातील चार सदस्य त्या पदार्थाचा चांगल्या प्रकारे आस्वाद घेऊ  शकतात एवढं त्याचं प्रमाण सहज भरतं. किंमत, प्रत, चव आणि वेगळेपण अशा सर्वच कसोटय़ांवर इथले पदार्थ खरे उतरणारे आहेत.

‘नथिंग बट चिकन’च्या वांद्रे, अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली, मीरा रोड, ठाणे, चेंबूर, पवई आणि वाशी येथे शाखा आहेत. त्यांच्या वेबसाइटवरूनही वर नमूद केलेल्या शाखांमधून पदार्थ ऑनलाइन मागवण्याची सोय आहे. तुम्ही चिकनचे चाहते असाल तर इथे न जाऊन चालणार नाही आणि नसाल तर ही जागा तुम्हाला चिकनच्या प्रेमात पाडेल हे नक्की.

नथिंग बट चिकन

* कुठे- शॉप नं. ३, चर्चवे को.ऑप.हा.सो.लि., मच्छी मार्केटजवळ, आय. सी. कॉलनी मेन रोड, बोरिवली (पश्चिम),

* कधी- सोमवार ते रविवार सकाळी १० ते रात्री ११ वाजेपर्यंत.

Twitter – @nprashant

nanawareprashant@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2018 1:56 am

Web Title: kahu khushal article by prashant nanaware
Next Stories
1 चार वर्षांचे  २८ लाख रुपये घरभाडे
2 राष्ट्रवादीची निम्म्या जागांची मागणी
3 ‘म्हाडा’ची घरे स्वस्त होणार
Just Now!
X