तेलंगणची भूमिका; फक्त जलपूजन केल्याचा दावा

मेडीगट्टा प्रकल्पासाठी तेलंगणने केवळ जलपूजा केली असल्याचा दावा केला असून धरणाची उंची १०० मीटपर्यंत वाढविण्यासाठी महाराष्ट्राने परवानगी दिल्यावरच काम सुरु केले जाईल आणि भूमीपूजनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रित केले जाईल, अशी भूमिका घेतली आहे.

प्रकल्पाच्या उंची वाढविण्याच्या कामाचा आराखडा राज्य सरकारने मंजूर केल्यावरच ते काम सुरु होईल, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हिताचाच आहे आणि फारसे भूसंपादनही करावे लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

तेलंगणाने दांडगाई करुन प्रकल्पाच्या उंची वाढविण्याचे काम हाती घेतले आहे व नुकतेच भूमीपूजनही केले. पण हा अपप्रचार काँग्रेसने सुरु केला असून विदर्भातील लोकांना भडकावले जात असल्याचा आरोप महाजन यांनी केला. तेलंगणचे जलसंपदा मंत्री हरीश राव यांनी महाजन यांची मंगळवारी भेट घेतली आणि त्यांच्याशी या प्रकल्पाविषयी चर्चा केली. प्रकल्पाची उंची १०० मीटर वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी केवळ ५६ हेक्टर खासगी जमीन संपादित करावी लागणार आहे.

वनजमीन जाणार नाही किंवा गावांचे पुनर्वसनही करावे लागणार नाही. १७ टीएमसी पाणी उपलब्ध  होणार असून राज्यातील सुमारे १५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे राज्याचा लाभच होणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

ल्ल प्रकल्पाचा आराखडा तेलंगणकडून सादर झाल्यावर तो ‘निरी’ सारख्या तज्ज्ञ संस्थेकडून तपासून घेऊन निर्णय घेतला जाईल. अंतिम निर्णय मंडळाकडून घेतला जाईल व त्यात दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे, असे महाजन यांनी स्पष्ट केले.