कल्याण रेल्वे स्टेशनजवळ रविवारी सकाळी बॅगेमध्ये सापडलेल्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. एका रिक्षामध्ये ही बॅग होती. प्रवासी रिक्षामध्ये बॅग सोडून पळून गेला होता. बॅगेमधून दुर्गंधी येत असल्याने रिक्षा चालकाने पोलिसांना याची माहिती दिली. बॅग उघडल्यानंतर त्यामध्ये महिलेचा शीर नसलेला मृतदेह होता. कल्याण पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली असून वडिलांनीच मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे.

अरविंद तिवारी (४७) असे आरोपीचे नाव आहे. टिटवाळा येथे राहणाऱ्या अरविंद तिवारी यांनी मुलीची हत्या केल्याचे कबूल केले आहे. पोलीस आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करत आहेत.

पोटच्या मुलीची हत्या का केली ?
मुलीचे दुसऱ्या एका मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. ते वडिलांना मान्य नव्हते. तिच्या प्रेमसंबंधांना वडिलांचा विरोध होता. मुलगी तिच्या निर्णयावर ठाम होती. पण हे सहन न झाल्यामुळे अरविंद तिवारी यांनी मुलीची निर्घृण हत्या केली.

कशी केली हत्या

अरविंद तिवारी फक्त मुलीची हत्या करुनच थांबले नाहीत तर त्यांनी गुन्हा लपवण्यासाठी मृतदेहाचे तीन तुकडे केले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते तुकडे बॅगेमध्ये भरुन रिक्षाने चालले होते. पण बॅग रिक्षामध्येच सोडून त्यांनी पळ काढला. आतापर्यंत फक्त शरीराचा खालचा भाग सापडला आहे.

आरोपीला कसे पकडले
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला शोधून काढले. कल्याण रेल्वे स्टेशनजवळ आरोपीने ज्या ठिकाणी रिक्षा सोडली तिथले आणि टिटवाळा रेल्वे स्थानकातील सूटकेससह ट्रेनमध्ये चढतानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले. सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. पोलिसांनी आरोपीचे फोटो स्थानिकांना दाखवले व त्याची ओळख पटवली. त्यानंतर पोलीस आरोपीच्या घरापर्यंत पोहोचले.