कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील २७ गावांच्या अधिसूचित क्षेत्रात ‘विकास केंद्र’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सुमारे एक हजार ८९ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवलीतील आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
‘एमएमआरडीए’ची १३८ वी बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात झाली. त्या वेळी कल्याण विकास क्षेत्र विकसित करण्यासाठी मान्यता देण्यात आली. हे केंद्र रस्ता आणि रेल्वेमार्गाने जोडण्यात येईल. मुंबईबाहेर रोजगारनिर्मिती होऊन महानगर प्रदेशाचा समतोल विकास होण्यास मदत होणार आहे. या विकास केंद्राच्या एक हजार ८९ हेक्टर क्षेत्रांपैकी पहिल्या टप्प्यात सुमारे ३३० हेक्टर क्षेत्र विकसित केले जाणार आहे. त्यात ३३० हेक्टर मोकळ्या जागा उपलब्ध होतील आणि त्यात ४४ हेक्टर शासकीय जमीन आहे. ती जमीन एमएमआरडीएला मोफत दिली जाणार आहे. निळजे रेल्वेस्थानक व राज्य मार्ग ४० व ४३ मधील सुमारे ३३० हेक्टर क्षेत्रांमध्ये मेगा सिटी प्रकल्प आणि विशेष नगर वसाहत प्रकल्प विकसित करण्याचे काम सुरू आहे. पालघर, ठाणे व रायगड जिल्हय़ातील विकासकामांसाठी एमएमआरडीएने ६० कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. रस्ते, काँक्रीटीकरण, गटारबांधणी व अन्य पायाभूत सुविधांसाठी हा निधी देण्यात आला आहे.