अचानक बसलेल्या गूढ धक्क्यांमुळे कल्याण-डोंबिवली परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली होती. हवामान खात्याच्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवली परिसरात जाणवलेले धक्के हे भुकंपाचे धक्के होते. रायगड जिल्ह्यात जमीनीखाली ५ किमी खोलीवर या भुकंपाचे केंद्र होते. त्याची तीव्रता २.८ रिश्टर स्केल असल्याचे आयएमडीने स्पष्ट केले आहे. १३ जुलै रोजी रात्री ९ वाजून ३१ मिनिटांनी हे धक्के बसले होते.

कल्याण पूर्व, पश्चिम डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळा या नागरी भागांसह कल्याण लगतच्या काही ग्रामीण भागातही हे धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. मात्र, हे धक्के बसल्याबाबत प्रशासनाकडून कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नसल्याने हे धक्के नक्की भुकंपाचे होते की इतर काही कारणांमुळे बसले होते याबाबत चर्चांना उधान आले होते.

शुक्रवारी रात्री ९.३१ वाजता कल्याण-डोंबिवली परिसरात अचानक हे धक्के जाणवले. पण तब्बल तीन मिनिटे अर्थात ९.३३ वाजेपर्यंत हे धक्के जाणवत होते. येथील नागरिकांनी याची माहिती दिली आहे. अचानक बसलेल्या या धक्क्यांमुळे भुकंप झाल्याचे वाटताच नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. अनेकांच्या घरातील भांडीही खाली पडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.