महापालिका आयुक्तपदी सनदी अधिकारी द्या, ही कल्याण-डोंबिवलीकरांची मागणी पूर्ण करून लोकांची वाहवा मिळविणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर राजकीय दबावापुढे नमते घेतले. मुख्यमंत्र्यांनी आपलाच निर्णय अवघ्या सात दिवसात मागे घेतला असून अप्पर जिल्हाधिकारी एम.जी. आर्दड यांची महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.
राज्यात सत्तांतरानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजवटीतील सर्वच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका फडणवीस यांनी लावला. मुख्यमंत्र्यांची ही धाडसी भूमिका पाहून कल्याण महापालिकेतही सनदी अधिकारी द्यावा असा आग्रह त्या भागातील लोकप्रतिनिधींनी धरला. नजीकच्या काळात होणारी या महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी शिवसेनेवर अंकुश ठेवण्यासाठी सुशील खोडावेकर या सनदी अधिकाऱ्याची आयुक्तपदी नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. मात्र शिवसेनेचा विरोध आणि स्वपक्षीयांचा दबाव यापुढे मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा नमते घ्यावे लागले आहे. त्यानुसार कल्याण महापालिका आयुक्तपदी पुन्हा सनदीऐवजी महसूल सेवेतील अधिकारी देण्यात आला आहे. गेल्याच आठवडय़ात हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या आर्दड यांना कल्याण-डोंबविली महापालिका आयुक्त म्हणून आणण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शिक्षण आयुक्तपदी जाण्यास तयार नसलेल्या आबासाहेब जऱ्हाड यांची एमआयडीसीत सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. सचिन कुरवे यांची महासंचालक (वनमती) म्हणून बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नंदकुमार यांची शिक्षण सचिव, तर सीमा व्यास यांची राज्य निवडणूक आयोगाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.