कमला मिल कंपाऊंडमधील आगीप्रकरणी ‘वन अबव्ह’ पबच्या दोन मॅनेजर्सना सोमवारी सकाळी मुंबई पोलिसांनी अटक केली. केविन बावा आणि लिस्बन लोपेज अशी या आरोपींची नावे आहेत.

कमला मिलमधील ‘वन अबव्ह’ या पबला गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी पबचे मालक हितेश संघवी, जीगर संघवी, अभिजीत मानकर आणि व्यवस्थापकासह भारतीय दंड विधानातील कलम ३०४ (सदोष मनुष्यवध), कलम ३३७, ३३८ (इतरांचा जीव धोक्यात येईल, अशी कृती) आणि ३४ (सामायिक इरादा) या कलमान्वये गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. हितेश आणि जीगर संघवीला आश्रय दिल्याचा ठपका ठेवत रविवारी पोलिसांनी राकेश संघवी आणि आदित्य संघवी यांना अटक केली होती. हे दोघे पबमालकांचे नातेवाईक आहेत. न्यायालयाने त्या दोघांची जामिनावर सुटका देखील केली होती.

सोमवारी पोलिसांनी ‘वन अबव्ह’ पबच्या दोन मॅनेजर्सना अटक केली. केविन बावा आणि लिस्बन लोपेज अशी त्यांची नावे आहेत. पब चालवण्याची जबाबदारी त्यांच्याकडेच होती. महापालिका व अग्निशमन दलाची परवानगी नसतानाही पबमध्ये काही बदल करण्यात आले होते. गुरुवारी रात्री आग लागल्यानंतर ग्राहकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याऐवजी हॉटेलचे कर्मचारीच आधी पळाले, अशी माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, ‘वन अबव्ह’चे मालक अजूनही फरार असून मॅनेजर्सच्या चौकशीतून मालकांविषयी माहिती मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असेल.

पोलिसांनी या प्रकरणात २७ प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी नोंदविल्या आहेत. आणखी काही प्रत्यक्षदर्शींचे जबाब घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ‘वन अबव्ह’ पबवर पोलिसांनी घटनेच्या तीन दिवसांपूर्वी कारवाई केल्याची माहिती देखील समोर येत आहे. हुक्का विक्री आणि ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ पब सुरु ठेवणे यासाठी ही कारवाई करण्यात आली होती. या पबवर गेल्या काही महिन्यांमध्ये एकूण आठ वेळा कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. गुरुवारच्या घटनेनंतर मुंबई महापालिकेला जाग आली असून रविवारपर्यंत मुंबई व उपनगरातील ३५५ ठिकाणी बेकायदा बांधकामे तोडण्यात आली.