मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांच्या मृत्यू झाल्यानंतर ही आग कशामुळे लागली याबद्दल चौकशी सुरु करण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याची माहिती समोर येत आहे. तरी नेटकऱ्यांनी या रेस्तराँमधील बार टेंडर्स करत असलेल्या आगीच्या खेळांबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.

ट्रेड हाऊसमधील टेरेसवर ‘१ अबव्ह’ आणि त्याच्या बाजूला मोजोस ब्रिस्ट्रो हे रुफ टॉप रेस्तराँ आणि बार आहेत. यातील ‘१ अबव्ह’मध्ये रात्री साडे बाराच्या सुमारास आग लागली आणि ही आग झपाट्याने मोजोस ब्रिस्ट्रो या पबपर्यंत पोहोचली. याच मोजोस ब्रिस्ट्रोमधील एक जुना व्हिडीओ या घटनेनंतर व्हायर झाला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ जिथे आग पसरली त्या कमला मिलमधील मोजो ब्रिस्टोमधीलच आहे. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीमध्ये निर्माते म्हणून काम कऱणारे समीर सावंत यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी अशाप्रकारच्या आगीच्या खेळांबद्दलच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे. ‘हे कलमा मिलमधील मोजोसमध्ये होणारे आगीचे खेळ सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहेत का? या हॉलेट्समध्ये सुरक्षेसंदर्भात सर्व उपाययोजना उपलब्ध आहेत का? काल रात्री लागलेली आग अशाच प्रकारच्या खेळांमधून लागली नसावी कशावरून? असे अनेक प्रश्न आहेत. पण यासंदर्भात कोणालाच काही पडलेली नाहीय. पैसे आहेत तर उधळा असा हा प्रकार आहे’ असे ट्विट सावंत यांनी केले आहे.

सावंत यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी या खेळांमुळे आग लागल्याची शक्यता नाकारता येत नाही असे मत व्यक्त केले आहे. मुंबईमधील अनेक मोठ्या बार्समध्ये अशाप्रकारे बार टेंडर्स आगीचे खेळ करताना दिसता. यापैकी अनेक बार घे कमी जागेत आणि अंधाऱ्या ठिकाणी असतात. तसेच हे खेळ सुरु असताना बारमध्ये गर्दी असते त्यामुळे अशी काही दुर्घटना झाल्यास मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता कमला मिलमधील आगीनंतर तरी महापालिकेचे अधिकाऱी अशा बार आणि रेस्तराँवर कारवाई करतात का हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. सध्या तरी कमला मिल परिसरातील सर्वच्या सर्व ४२ हॉटेल्सकडे असलेल्या परवान्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.