केवळ नशिबाच्या हवाल्यावर मुंबईचा दिवस सरतो. अचानक एखाद्या अनपेक्षिताचा घाला पडतो, आणि मृत्यू झडप घालून निष्पापांचा घास घेतो. हळहळ, वेदना आणि संतापही व्यक्त होतो. संकटांचे ओझे उरावर घेऊन दमछाक झालेली मुंबई पुढचे काही दिवस ढकलतच पुन्हा नाइलाजाने पूर्वपदावर येते. सारे काही सुरळीत होत असल्याचा भास व्हावा, तोच दबा धरून बसलेली संकटे पुन्हा डोके वर काढतात. पुन्हा तेच, मृत्यूचे तांडव, शोकभावांचे प्रदर्शन, संतापाचा उद्रेक, चौकशांच्या घोषणा.. हे चक्र आणि भयाची भावनाही संपतच नाही.. गेल्या वर्षभरात असे असंख्य घाव मुंबईने सोसले. किती तरी कुटुंबे उद्ध्वस्त झाली, अनेकांचे छत्र हरपले, किती तरी निष्पापांचे भविष्य अंधारमय झाले. काही दिवसांनंतर अशा दुर्घटना भूतकाळात जाऊन बसतात आणि नव्या अनपेक्षिताच्या भीतीने मुंबईकर आला दिवस ढकलू लागतो. दुर्घटनांमध्ये गमावलेल्यांची कुटुंबे हतबलपणे न्यायाकडे डोळे लावून थकून जातात.

बरोबर पाच महिन्यांपूर्वी, २६ जुलै रोजी घाटकोपरमधील सिद्धीसाई इमारत कोसळली. १७ जणांचा मृत्यूने घास घेतला. तळमजल्यावरील नर्सिग होम बंद करून तेथे बार सुरू करण्याच्या इराद्याने मालकाने केलेल्या तोडफोडीचे पाप १७ निष्पापांना भोगावे लागले. त्याआधीच्या महिन्यातच, ३० जूनला अंधेरीच्या जुहू गल्लीतील एका औषधांच्या दुकानास आग लागून आठ जण होरपळून मरण पावले होते. लागोपाठ घडलेल्या या दुर्घटनांनंतर अवघी मुबंई संतापाने धगधगू लागली. सिद्धिसाईच्या फेरफारास परवानगी कशी मिळाली, भर वस्तीतील या तोडफोडीतून पावलापावलाने पुढे सरकणाऱ्या संकटाकडे पालिकेने दुर्लक्ष का केले, असे सवाल उमटू लागले, आणि, भ्रष्ट यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळेच अशा दुर्घटना घडतात, असा निष्कर्ष जनतेने काढला. पण प्रशासनाला चौकशीच्या प्रक्रियांचे कर्तव्य पार पाडावे लागते. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी दोघा अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली. १५ दिवसांत या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या घटनेला आता पाच महिने उलटले. चौकशी समितीचा अहवाल आला. पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याप्रकरणी दुर्लक्ष केल्याचे आढळून आले नाही असा निष्कर्ष निघाला, आणि भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी जनजागृती करण्याचा सल्ला देऊन चौकशी समितीने आपले कर्तव्य पार पाडले. या दुर्घटनेच्या जखमा भळभळत असतानाच, ३१ ऑगस्टला भेंडीबाजारातील १०० वर्षे जुनी अल हुसैनी इमारत कोसळली. ३० हून अधिक रहिवाशांचा जीव गेला. पुन्हा दु:खाने मुंबई गदगदून गेली.

..मुंबई केवळ रामभरोसे जगते आहे, मृत्यूचे सावट सतत आसपास आहे, आणि या सावटातून बाहेर पडण्याचा विश्वास देण्यासाठी शासन किंवा प्रशासन यंत्रणा फारशा सक्षम नाहीत याची जाणीव एव्हाना सामान्य मुंबईकरास झाली आहे. आला दिवस ढकलत, नवा दिवस पाहण्याचे भाग्य लाभलेला प्रत्येक मुंबईकर सकाळी जाग आल्यावर परमेश्वराचे आभार मानतो आणि नव्या दिवसातील पुढच्या प्रत्येक क्षणास सामोरा जाण्यासाठी स्वत:ला घराबाहेर ढकलतो.. कुणी तरी अभागी जीव अशाच एखाद्या दबा धरून बसलेल्या क्षणाची शिकार होतो, आणि दु:खाच्या जुन्या वेदनांची खपली पुन्हा निघते..

भेंडीबाजारातील दुर्घटनेच्या जखमा ओल्या असतानाच २९ ऑगस्टच्या अतिवृष्टीमुळे परळमध्ये जलमय झालेल्या रस्त्यावरील एका उघडय़ा मॅनहोलमध्ये पडून डॉक्टर अमरापूरकरांचा अंत ओढवला आणि पुन्हा संतापाने मुंबई पेटली. पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणावर कोरडे उमटू लागले.  वैद्यकीय क्षेत्राने पालिका प्रशासनास धारेवर धरले. दबाव वाढू लागला, आणि न्यायालयानेही पालिका प्रशासनास तंबी दिली. पुन्हा चौकशी समिती स्थापन झाली. १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे फर्मान आयुक्तांनी सोडले, आणि मुंबईकर नागरिकांचा संताप धगधगत असतानाच, त्याच महिन्यात, २९ सप्टेंबरला एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाच्या पुलावर चेंगराचेंगरीने २२ निष्पापांचा बळी घेऊन मुंबईकरांच्या भयग्रस्त मनावर नव्या भीतीचा भयाण ओरखडा ओढला..

अशा दु:खाचे ओझे वागवतच वर्ष अखेरीकडे सरकत असतानाच १८ डिसेंबरला अंधेरीच्या साकीनाका परिसरात फरसाणच्या कारखान्याला भीषण आग लागली आणि १२ जणांचा होरपळून, गुदमरून मृत्यू झाला. मुंबईत जगणे महाग झाले आणि मरण मात्र स्वस्त अशी भावना बळावू लागली. अशा काही दुर्घटना घडून गेल्या की पालिका प्रशासन, सरकार, मंत्री, नेते घटनास्थळी धाव घेतात, दु:ख व्यक्त करतात, खरमरीत भाषणे करतात, चौकशीचे आदेशही देतात, कारवाईची आश्वासने देतात.. हे सारे आता मुंबईकरांना सवयीचे झाले आहे. काल, २८ डिसेंबरला कमला मिल कम्पाऊंडमधील भीषण अग्नितांडवानंतरही ते सारे सोपस्कार पार पडले आहेत. दोषींची गय केली जाणार नाही असे मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री-नेत्यांनी ठणकावून सांगितले आहे.

मावळत्या वर्षांला आनंदाने निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज होत असतानाच, एका नव्या जखमेच्या वेदना सोसाव्या लागत आहेत. मावळत्या वर्षीच्या या जखमेच्या वेदना घेऊनच नवे वर्ष उजाडणार आहे. भयाचे सावट आसपास कायमच आहे याची नव्या वर्षांतही ही जखम आठवण करून देत राहणार आहे.