लोअर परळमधील कमला मिलस्थित ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजो ब्रिस्टो’मध्ये लागलेल्या भीषण आगीप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार करण्यात येत असलेली या प्रकरणाची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये कमला मिल अग्नितांडवाचा चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचे समजते. या प्रकरणी चौकशी अहवालात काही पालिका अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.

कमला मिलमधील ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजो ब्रिस्टो’ या रेस्टोपबमध्ये २९ डिसेंबर रोजी भीषण आग लागली होती. या आगीमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. रेस्टोपब सजविण्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्यामुळे आगीचा भडका उडाला आणि दोन्ही रेस्टोपब आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेनंतर मुंबईतील हॉटेलमधील अनधिकृत बांधकामे आणि अग्निप्रतिबंधक उपाययोजनांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी अजोय मेहता यांना दिले होते.

या प्रकरणाची चौकशी अंतिम टप्प्यात आली असून ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजो ब्रिस्टो’मध्ये करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम आणि अग्निसुरक्षाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी याबाबत तपासणी करण्याची जबाबदारी असलेल्या पालिका अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आल्याचे समजते. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये अजोय मेहता चौकशी अहवाल देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करणार आहेत.