विमानतळावर जाण्याचा मार्ग लवकरच सुकर

कुर्ला-अंधेरी मार्गावरील कमानी ते साकिनाका जंक्शनदरम्यानची वाहतूक कोंडी फोडून कोकणासह पुण्यातून मुंबई विमानतळ आणि आसपासच्या परिसरात अथवा मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि जलद करण्यासाठी पालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. हा मार्ग रुंद करण्यात अडथळा ठरणाऱ्या झोपडय़ा येत्या सोमवारी हटविण्यात येणार असून प्रकल्पग्रस्तांचे कुर्ला, बोरिवली परिसरात पुनर्वसन करण्यात आले आहे. काही घरांचे निम्मे बांधकाम तोडावे लागणार असून उर्वरित घरांवर तोडलेल्या क्षेत्रफळाइतके बांधकाम करण्यास परवानगी त्यांना देण्यात आली आहे.

कुर्ला-अंधेरी मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. केवळ कमानी ते साकिनाका जंक्शनदरम्यानचा रस्ता अरुंद असल्याने येथे दिवसभर वाहतूक कोंडी असते. कोकणातून अथवा पुण्यातून येणाऱ्या मंडळींना तब्बल दोन तास या ठिकाणी अडकून पडावे लागते. हा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेने गणेशोत्सवापूर्वी कमानी-साकिनाका जंक्शनदरम्यानच्या ५४ पैकी २२ झोपडपट्टय़ा जमीनदोस्त केल्या आणि या झोपडपट्टीवासीयांचे घाटकोपर (पू.) येथे पुनर्वसन केले. उर्वरित ३२ पैकी चार झोपडय़ा अपात्र ठरल्या असून २८ झोपडय़ा येत्या सोमवारी तोडण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यापैकी काही झोपडपट्टीवासीयांचे कुर्ला (पू.) आणि बोरिवली येथे पुनर्वसन करण्यात येणार आहे. काही झोपडय़ांचे निम्मे बांधकाम तोडावे लागणार आहे. त्यामुळे उर्वरित घरावर तोडलेल्या क्षेत्रफळाइतके बांधकाम करण्याची परवानगी संबंधितांना देण्यात येणार आहे. असे असले तरी त्यांना १४ फुटांपेक्षा उंच बांधकाम करता येणार नाही. गेले अनेक महिने या मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न रेंगाळला होता. त्यासाठी मनसेतर्फे आंदोलनेही करण्यात आली होती. अखेर आता येत्या सोमवारी झोपडय़ा हटवून रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.