दिवाळीनिमित्त नव्याकोऱ्या साडीपासून दागदागिन्यांची जोरदार खरेदी करणात शहरांतील महिला मश्गूल असताना त्यांच्याच आसपास असलेल्या एका वस्तीत मात्र दिवाळी होत नाही. खरे तर तेथे दिवाळी साजरी करण्यासाठी वेळच मिळत नाही. सुट्टीत तेथे ग्राहाकांची प्रचंड गर्दी असते. येथे ना कंदील असतो ना रांगोळी; असतो फक्त एक मिणमिणता दिवा. ही वस्ती म्हणजे मुंबईतील कामाठीपुरा.
एरवी रात्रभर पुरुषांनी गजबजलेल्या या वस्तीमध्ये सुट्टय़ांच्या काळात संध्याकाळपासूनच गर्दी होत असल्याचे चित्र असते. यामुळे येथील महिलांना दिवाळी साजरी करण्यासाठी विशेष वेळही मिळत नाही आणि यांनी दिवाळी साजरी करावी म्हणून कुणी पुढेही सरसावत नाही. दिवाळी हा आप्तजनांना भेटण्याचा सण आहे, पण आमचे सर्व नातेवाईक परगावी आहेत. त्यामुळे दिवाळी साजरी करण्याची इच्छा होत नाही. सण आहे म्हणून केव्हा तरी आम्ही दाराला तोरण लावतो व रेडिमेड रांगोळीचे छाप दारासमोर चिकटवतो. पण फराळ बनविण्याची पद्धत आमच्याकडे नाही. वाटलेच तर जेवणात काही तरी वेगळे पदार्थ बनवितो पण हे सर्व आम्हाला दुपापर्यंत आटपून घ्यावे लागते, कारण संध्याकाळी ग्राहक यायला लागले की, आम्हाला वेळ मिळत नाही, असे मत त्या वस्तीत काम करणाऱ्या स्त्रीने दिले.
येथील स्त्रिया बऱ्याचदा मनाविरोधात हे काम करीत आहेत. स्वत:चे पोट भरणे, मुलांचे पालनपोषण करणे हेच करणे कठीण झाले असताना या भागातील स्त्रिया इतरांसारखी दिवाळी साजरी करत नाहीत, असे मत या परिसरातील पोलीस शिपाई असलेले उमेश सूर्यवंशी यांनी दिले. तर तिथेच फुलांचे दुकान चालवणाऱ्यांच्या मते येथे जरी इतरांसारखी दिवाळी साजरी होत नसली तरी येथील बंगाली स्त्रिया दिवाळीत कालिमातेची पूजा नक्की करतात. त्यामुळे येथे दिवाळीत इतर दिवसांच्या तुलनेत दिवाळीच्या दिवसात फुलांची मागणी जास्त असते.
दिवाळी म्हणजे काय?
मुंबईत स्थित असलेल्या या वस्तीत राहणाऱ्या बऱ्याच मुलांना दिवाळी म्हणजे काय? ती का साजरी केली जाते? हे माहीत नाही, असे मत त्या वस्तीतीला मुलांचा सांभाळ करणाऱ्या साल्वेशन आर्मी या संस्थेच्या पिंकी ख्रिस्टन यांनी सांगितले. त्यांच्या मते ही मुले वेगवेगळ्या देशातून आली आहेत आणि ही दिवसातील काहीच तास आपल्या आईकडे असतात. दिवसभर ही मुले आमच्याकडे असतात. रात्रीच्या वेळेत त्यांना बाहेर पाठविले जात नाही.
खासदारांची बांधीलकी
क्रांती या स्वयंसेवी संस्थेतर्फे  सांभाळल्या जाणाऱ्याशरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलींसोबत उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनी नुकतीच दिवाळी साजरी केली. संस्थेत सांभाळ होत असलेल्या १२ मुलींसोबत महाजन यांनी संवाद साधला व त्यांची स्वप्ने, महत्त्वाकांक्षा जाणून घेत त्यांना फराळ व जीवनावश्यक वस्तू भेट म्हणून दिल्या.