News Flash

अग्निशमन अधिकारी बंडाच्या पवित्र्यात!

हॉटेल, पब, रेस्तराँ, मॉल्स आदींना ‘ना-हरकत’ देण्याचा धसकाच घेतलेले अधिकारी मंडळी बंडाच्या पवित्र्यात आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

कारवाईमुळे सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा

कमला मिल अग्नितांडव प्रकरणात एक अग्निशमन अधिकारी निलंबित, तर अन्य एका अधिकाऱ्याला झालेली अटक यामुळे मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी हादरले आहेत. इतकेच नव्हे तर अशा पद्धतीने ठपका ठेवून निलंबन आणि अटक करण्यात येणार असेल तर सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच, ‘ना-हरकत’ देण्याची पद्धत सदोष असल्याचा दावा करत त्यांनी बंडाचा झेंडा फडकविण्याचा पवित्रा घेतला आहे.

लोअर परळ येथील कमला मिलमधील ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजो बिस्त्रो’ या दोन रेस्टोपबमध्ये आग लागून त्यात १४ जणांचा बळी गेला होता. या प्रकरणात प्रथमदर्शी दोषी आढळलेल्या  पाच जणांना तात्काळ निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली. या पाच जणांमध्ये अग्निशमन अधिकारी एस. एस. शिंदे यांचा समावेश होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार या प्रकरणाची चौकशी करून पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी चौकशी अहवाल सादर केला. त्यात दोन साहाय्यक आयुक्तांसह १० जणांची चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली होती. हा अहवाल सादर झाल्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलातील अधिकारी राजेंद्र पाटील यांना अटक केली. पुरावे सादर करताना त्यात फेरबदल करण्यात आल्याचा ठपका राजेंद्र पाटील यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एस. एस. शिंदे आणि राजेंद्र पाटील या दोघांवर झालेल्या कारवाईमुळे अग्निशमन दल हादरले आहे. हॉटेल, पब, रेस्तराँ, मॉल्स आदींना ‘ना-हरकत’ देण्याचा धसकाच घेतलेले अधिकारी मंडळी बंडाच्या पवित्र्यात आहेत.

अग्निशमन दलाकडून हॉटेल, पब, रेस्तराँ, मॉल्स आदींना ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र देताना संबंधित ठिकाणाची पाहणी करून त्रुटी असलेल्या बाबींची पूर्तता करण्याची सूचना करण्यात येते.

अटीसापेक्ष ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचे त्यावर नमूद करण्यात येते. मात्र संबंधितांना सुचविलेल्या बाबींची पूर्तता करण्यात येते की नाही याची पाहणी अग्निशमन दलाकडून करण्यात येत नाही. अग्निशमन दलाने अटीसापेक्ष दिलेल्या ‘ना-हरकत’ प्रमाणपत्रातील बाबींची संबंधितांनी पूर्तता केली की नाही याची खातरजमा करून पालिकेच्या आरोग्य विभागाने परवाना देणे आवश्यक आहे. मात्र आरोग्य विभागातील अधिकारी या बाबींची पाहणी न करताच परवाना देतात, असा आरोप अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर केला.

आयुक्तांनी हा प्रश्न गांभीर्याने सोडवावा!

अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांच्याकडे धाव घेत ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र देण्याच्या पद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र देण्याची पद्धत सदोष असल्याचे या अधिकाऱ्यांनी प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. या पद्धतीमुळे ‘ना-हरकत’ प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करणारे अधिकारी अडचणीत येण्याची भीतीही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ‘ना-हरकत’ प्रमाणपत्राच्या सदोष पद्धतीमुळे निलंबन, अटक आणि अन्य कारवाई होऊ शकते. तसे झाले तर अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकारी सामूहिक राजीनामा देतील, असा इशारा अधिकारी मंडळींनी या बैठकीत दिल्याचे समजते. एकूणच परिस्थितीमुळे अग्निशमन दलातील अधिकारी बंडाच्या पवित्र्यात आहेत. पालिका आयुक्तांनी गांभीर्याने हा प्रश्न सोडवावा, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

अग्निशमन केंद्र अधिकाऱ्यांच्या कामात बदल करण्यात आला असून त्यांच्यावर कारकुनी काम सोपविण्यात आले आहे. या कामाचा भार सांभाळून त्यांना महत्त्वाची कामे करावी लागत आहे. ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र देण्याच्या सदोष पद्धतीमुळे अधिकारी अडचणीत येऊ लागले आहेत. अग्निशमन दलाने ‘ना-हरकत’ देताना निदर्शनास आणलेल्या त्रुटींची पूर्तता केली की नाही याची पाहणी करून आरोग्य विभागाने परवाना द्यायला हरकत नाही. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी तातडीने बैठक बोलावून अग्निशमन दलातील त्रुटी दूर कराव्या.

–  प्रकाश देवदास, अध्यक्ष, फायर ब्रिगेड ऑफिसर्स असोसिएशन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 4:23 am

Web Title: kamla mill fire tragedy fire officer
Next Stories
1 पेट्रोल ८०, तर डिझेल ६७ रुपयांवर
2 धन्य आमुची सयाजी नगरी, धन्य आमुची बडोदे नगरी..
3 राज्याचा ‘सनदी’कोटा वाढला
Just Now!
X