ज्येष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांची नाटय़ परिषदेकडे मागणी, जीवनगौरव पुरस्कार प्रदान

आपली रंगभूमी प्रायोगिक रंगभूमीमुळे समृद्ध झाली आहे. प्रायोगिक रंगभूमीच्या आधारानेच ती बहरते आहे. त्यामुळे प्रायोगिक रंगभूमीसाठी दामू केंकरे यांच्या नावाने पुढील संमेलन व्हायच्या आधी रंगमंच उभारावा, अशी मागणी ज्येष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांनी नाटय़ परिषदेकडे केली. अखिल भारतीय नाटय़ परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार नाडकर्णी यांना प्रदान करण्यात आला त्या वेळी त्यांनी ही मागणी केली.

यशवंत नाटय़मंदिर, माटुंगा येथे नाटय़ परिषदेचा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. नाडकर्णी म्हणाले, दामू केंकरे यांच्यासहित ज्येष्ठ रंगकर्मी २००७ मध्ये प्रायोगिक रंगभूमीसाठी स्वतंत्र रंगमंचाच्या मागणीकरता भर पावसात रस्त्यावर उतरले होते. इतकी वर्षे लोटली अजून प्रायोगिक रंगभूमीसाठी रंगमंच उभारला गेला नाही. या वर्षी नाटय़ संमेलनाचा सोहळा बाजूला ठेवून प्रायोगिक रंगभूमीसाठी रंगमंच उभारण्याचे काम हाती घ्यावे, सरकारनेही त्याला हातभार लावावा, असेही नाडकर्णी यांनी म्हटले. आपल्याकडील ग्रंथखजिना नाटय़ परिषदेला देणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

या पुरस्कार सोहळ्यात सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, डॉ. जब्बार पटेल, अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासह नाटय़ परिषदेचे इतर समिती सदस्य उपस्थित होते. डॉ. जब्बार पटेल, नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, विनोद तावडे यांनीही नाडकर्णी यांच्या मागणीचा पुनरुच्चार केला. प्रसाद कांबळी यांनी नाटय़गृह उभारणी किंवा नाटय़गृह पुनर्विकास करायचा झाल्यास नाटकाशी संबंधित एक समिती नेमून त्या समितीच्या परवानगीने ते काम पूर्ण केले जावे, अशी मागणी सांस्कृतिकमंत्री तावडे यांच्याकडे केली. अखिल भारतीय नाटय़ परिषद रंगकर्मीना ‘नाटककार गोविंद बल्लाळ देवल स्मृती दिनाप्रीत्यर्थ’ दरवर्षी १३ जूनला पुरस्कार देऊन सन्मानित करते. यावर्षी सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक पुरस्कार ‘लोकसत्ता’ने शिफारस केलेले ‘सोयरे सकळ’ या नाटकाला मिळाला. त्याचबरोबर ‘हॅम्लेट’, ‘एपिक गडबड’, ‘गुमनाम है कोई’, ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकांनीही विविध पुरस्कार विभागात बाजी मारली. प्रायोगिक आणि हौशी रंगभूमीवरील कलाकारांनाही या पुरस्कार सोहळ्यात गौरवण्यात आले.

नाटकाची ‘सेन्सॉरशिप’ रद्द?

सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी स्ट्रिमिंगच्या जमान्यात नाटकाला आता सेन्सॉरशिपची गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित करून नाटकाची सेन्सॉरशिप रद्द करण्याचे संकेत दिले. तसेच रवींद्र नाटय़मंदिर येथील जागेत प्रायोगिक रंगभूमीसाठी रंगमंच उभारणीचे काम सुरू असल्याचेही सांगितले.