मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेमधील संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना पालिकेने तिच्या घरातील कार्यालयात उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. हिमाचल प्रदेशातून बुधवारी ती मुंबईत दाखल होताच प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि राजकीय वर्तुळाने सारे विषय बाजूला सारत कंगनावर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर घरावरील कारवाईवरून कंगनाने दिवसभर ट्विटरवरून थयथयाट केला. याच मुद्द्यावरुन सोशल मिडियावर दिवसभर चर्चा सुरु होती. दोन्ही बाजूचे समर्थक हॅशटॅग वॉरमध्ये अडकल्याचे चित्र पाहायला मिळाले. या प्रकरणावरुन अनेक मान्यवर व्यक्तींनी ट्विटवरुन प्रितिक्रिया दिल्या. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनाही ट्विटवरुन यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली.

अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबद्दल दिलेल्या प्रतिक्रियेचा एका मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अमृता यांनी, “जेव्हा अन्याय कायदा होतो, तेव्हा बंडखोरी कर्तव्य ठरते” अशी कॅफ्शन दिली आहे.

व्हिडिओत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आहेत?

अमृता यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई सर्वांवर झाली तर ती योग्य वाटली असतील असं म्हटलं आहे. “आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना आम्ही रस्त्यामध्ये थांबवून मारु. हे काम सरकारच्या समर्थनाने करु हे असं याआधी महाराष्ट्राच्या इतिहासात घडलं नाही. जे चूक आहे त्याला चूक म्हटलं पाहिजे. मात्र त्या गोष्टींने महाराष्ट्राचा किंवा महाराष्ट्र पोलिसांचा अपमान झाला आहे. महाराष्ट्राचा तेवढाच अपमान देशभरामध्ये सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे त्यामुळे होत आहे. बेकायदेशीर बांधकाम असेल तर बांधकामावर कारवाई केलीच पाहिजे. मात्र सर्वांविरोधात ही कारवाई झाली असती तर योग्य कारवाई असती. कोणीतरी आपल्याविरोधात बोललं म्हणून आपण कारवाई करत असू तर हा भित्रेपणा आहे, सूड उगवण्याच्या भावनेने केलेली कारवाई आहे असं दिसतं. महाराष्ट्रामध्ये अशा भावनेचा सन्मान होणं शक्य नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा एकेरी वापर करत कंगनाने ‘फिल्म माफियांसोबत हातमिळवणी करत तुम्ही माझे घर तोडले असून तुमचेही गर्वहरण होईल, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली. कंगनाने मुंबईतील परिस्थिती पाकिस्तानव्याप्त काश्मीरप्रमाणे असल्यासारखे म्हटल्याने टीका झाली होती. त्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर कंगनाने आपल्याला मुंबईत पुन्हा येऊ  नको, अशा धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप केला होता. तसेच आपण ९ तारखेला मुंबईत येत असून हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आवाहन दिले होते. बुधवारी कंगना मुंबईत पोहोचली. महापालिकेचे कर्मचारी तिच्या घरातील अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी गेले असता कंगनाने ट्विटरवरून त्यांचा समाचार घेतला.

पालिकेच्या नोटीशीत काय उल्लेख?

कंगनाच्या घरात १४ अनधिकृत बांधकामे केल्याचे पालिकेच्या नोटिशीत नमूद करण्यात आले होते. काही ठिकाणी अनधिकृतपणे खोल्या उभारण्यात आल्याचे नोटिशीत म्हटले होते. मात्र मुंबई महापालिकेने कालपर्यंत कोणतीही नोटीस पाठवली नाही. नूतनीकरणासंदर्भात सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असल्याचे तिने सांगितले.