वन विभागात सेवा बजावताना पर्यावरणाविषयी सजगता जोपासणारे कोल्हापुरातील वनरक्षक सलीम मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या बाल कादंबरीस बालसाहित्य साहित्य अकादमी पुरस्कार शुक्रवारी घोषित करण्यात आला. त्यांच्याबरोबरीनेच, सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या काव्यसंग्रहाला देखील हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
कोल्हापुर जिल्हातील तळंदगे (ता. हातकणंगले) या गावातील सलीम मुल्ला यांना साहित्यात रुची होती. पुढे वन विभागात वन रक्षक पदावर रुजू झाल्यावरही त्यांची साहित्याची आवड आणखीच वाढली. लहान मुलांना पर्यावरणाची गोडी लागावी हा त्यांच्या लेखनाचा उद्देश आहे.
सलीम मुल्ला यांनी २००२ मध्ये लिहलेल्या ‘अवलिया’ या ललित लेखाच्या पुस्तकाचे प्रकाशन साहित्य संस्कृती मंडळाने केले होते. २०१४ मध्ये त्यांनी ‘जंगल खजिन्याच्या शोधात’ ही बालकादंबरी साकारली. पुण्याच्या दर्या प्रकाशनने ती प्रसिद्ध केली. या बाल कादंबरीला दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला होता. तर, आता युवा साहित्य अकादमी पुरस्कार घोषित करण्यात आला. ‘जंगल खजिन्याचा’ शोध ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून या उत्कंठावर्धक कथेची गुंफण मुल्ला यांनी या कादंबरीत केली आहे. निसर्गाची नवलाई, पशु पक्षांच्या हरकतींचा मागमूस, जंगलातील मौल्यवान औषधी वनस्पतींची तस्करी, या टोळ्यांचे निर्दालन करणारी वानरसेना याचे लोभसवाणे चित्रण या रेखाटले आहे. वन रक्षक म्हणुन सेवा बजावताना निसर्गाचे घडणारे दर्शन त्यांनी पुस्तक, ललित लेख, वृत्तपत्र लेखन या माध्यमातून वाचकापर्यंत आणले आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात प्रकशित झालेल्या त्यांच्या ‘ऋतुफेरा ‘ या ललित लेखांच्या पुस्तकास अमरावतीच्या संस्थेचा राज्य वाङमय पुरस्कार मिळाला आहे.
‘जंगल खजिन्याचा शोध’ या बाल कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार घोषित झाल्याने सलीम मुल्ला यांनी आनंद व्यक्त केला. पशु पक्षी , वन्यजीवन याचा तपशील नव्या पिढीसमोर आणून त्यांना पर्यावरण विषयी डोळस बनवण्याच्या माझ्या प्रयत्नाला ही मोठी आणि अमूल्य दाद असल्याची प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 14, 2019 7:53 pm